नवी दिल्ली : आंध्रप्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ६२ हजार दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवून त्यांना नष्ट केले आहे. या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नष्ट करण्यात आलेल्या दारूच्या बाटलांमध्ये विदेशी दारू, देशी दारू आणि बिअरच्या बाटलांचा समावेश होता, ही दारू पोलिसांनी विविध अवैध ठिकाणांहून जप्त केली होती.
दरम्यान, या दारूच्या बाटलांची किंमत तब्बल २ कोटी रूपये असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी केलेली कारवाई पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी प्रथम दारूच्या सर्व बाटला मोकळ्या रस्त्यावर ठेवल्या आणि नंतर त्यांच्यावरून बुलडोझर फिरवून २ कोटींचा माल चक्काचूर केला.
कोणती दारू केली नष्ट?पोलिसांनी विविध ८२२ अवैध प्रकरणांमधून जप्त केलेली दारू बुलडोझरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आली आहे. जवळपास २ वर्षांपासून पोलिसांकडे असलेल्या या दारूला अखेर नष्ट करण्यात आले. याप्रकरणी माहिती देताना पोलीस आयुक्त कांथी राणा यांनी सांगितले, "विविध ब्रँडच्या ६२ हजार दारूच्या बाटल्या नष्ट करण्यात आल्या आहेत."
आंध्रप्रदेश उत्पादन शुल्क कायद्यानुसार, दुसऱ्या राज्यातून आणलेल्या दारूच्या फक्त तीन बॉटल्स राज्यात आणण्याची परवानगी आहे. जर कोणत्या व्यक्तीने ३ पेक्षा जास्त बॉटल्स आणल्या तर पोलीस जप्त करतात आणि ही तीच दारू आहे जी पोलिसांकडून नष्ट करण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार एक समिती तयार करून अशी दारू नष्ट केली जाते. विशेष म्हणजे या कारवाईची व्हिडीओ काढली जाते आणि खरोखर या दारूला नष्ट केले आहे याची पुराव्यासह माहिती कोर्टात दिली जाते.