तुमच्यासोबतही असं अनेकदा झालं असेल की, शेजारच्या घरात जोरजोरात पार्टीत सुरू असल्याने तुम्ही हैराण झाले असाल, पण काहीच करू शकले नाहीत. अशावेळी तुम्ही पोलिसात तक्रार करूनही काही होत नसेल तर डोक्याचा ताप आणखीनच वाढतो. पण अशाच एका स्थितीत अडकलेल्या व्यक्तीने शेजारच्यांना वैतागून त्यांच्या विरूद्ध जणू युद्धच पुकारलं.
ट्विटरपासून ते रेडिटपर्यंत सगळीकडे एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या ३३ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये काही लोक इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत. कारण त्यांच्या डोक्यावर एक ड्रोन उडत आहे. बरं हे ड्रोन केवळ उडतच नाहीये तर त्यात काही फटाके सुद्धा लावण्यात आले आहेत. हे फटाके तिथे उभे असलेल्या लोकांवर सोडले जात आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, इकडे-तिकडे धावणारे हे लोक रस्त्यावर जोरजोरात म्युझिक वाजवत होते. शेजारच्या घरातील एका व्यक्तीने त्यांना आवाज कमी करण्यास सांगितलं. पण या लोकांनी आवाज कमी न करता गोंधळ सुरूच ठेवला. मग काय शेजारी व्यक्ती राग अनावर झाला आणि त्याने ड्रोनमध्ये फटाके लावून रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या लोकांवर हल्लाच केला.
सोशल मीडियातील काही लोकांचं म्हणणं आहे की, हा व्हिडीओ टेक्सास येथील आहे. तर काही लोक सांगताहेत की, हा व्हिडीओ ब्राझिलचा आहे. व्हिडीओ कुठला आहे जरी कन्फर्म नसलं तरी ड्रोनच्या मालकाचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.
असं असलं तरी ड्रोनचा असा वापर करणं येणाऱ्या काळाता किती घातक ठरू शकतं हेही दिसतं. तसेही सामान्य लोकांनी ड्रोनच्या वापर करण्यावरून आधीच प्रश्न विचारले जात आहेत. अशात हा व्हिडीओ मनात भीतीही निर्माण करतो.