नवी दिल्ली ।
भारतीय लष्करातील जवानांचे कार्य देशवासियांसाठी अनमोल आहे. देशवासियांवर ज्या ज्या वेळी एखादं संकट ओढावतं तेव्हा भारतीय जवानच मदतीसाठी तत्पर असतात. मग ते सीमेचे रक्षण असो की देशातील काही समस्या लष्करातील जवान देशवासियांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात. स्वत:चा जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचा गेल्या वर्षीचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लष्करातील जवान उताराच्या दिशेला आहेत आणि वरून पाण्याचा मोठा प्रवाह येताना दिसतो. मुसळधार पावसामुळे काही लोक दुकानाच्या बाजूला अडकले आहेत, मात्र त्यांना तिथून काढण्यासाठी जवान जिवाची बाजी लावत आहेत. एक मानवीसाखळी बनवून जवान संकटात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात नैनीतालमध्ये आलेल्या पुराचा आहे.
जवानांचा थरारक व्हिडीओ व्हायरलभारतीय लष्करातील जवानांनी मानवीसाखळी करून पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं होतं. जवानांचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ @Soldierathon या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. "देशासाठी आणि देशवासीयांसाठी सदैव बलिदान देण्याची हिंमत ज्यांच्यामध्ये असते त्यांनाच तर सैनिक म्हणतात. जय हिंद.", असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख ४८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर २६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. जवानांच्या या धाडसाचे कौतुक करत युजर्संनी त्यांना योद्धा म्हटले आहे. तर काहींनी जवानांचे प्रशिक्षक आणि त्यांना जन्म देणाऱ्या आई-वडिलांचे देखील विशेष कौतुक केले आहे.