बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथील यशवंतपूरमधील लोक काही काळ हैराण झाले. कारण, त्यांना येथील रस्त्यांवर एक अंतराळवीर चालताना दिसला. रात्रीच्या अंधारात या अंतराळवीराला चालताना पाहिले असता, चंद्रावरील ओबडधोबड खड्ड्यांवर चालत असल्यासारखे वाटत होते.
सध्या बंगळुरु शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारचे आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रसिद्ध कलाकार बादल नानजुंदास्वामी यांनी अशा प्रकारचे आर्टवर्क असलेला एक व्हिडिओ तयार केला आहे. जेणेकरुन बंगळुरुचे खड्डे पाहून सर्वांना चंद्रावरील खड्डे असल्याचे वाटेल. त्यासाठी अशा अंतराळवीराची कल्पना बादल नानजुंदास्वामी साकारत हा व्हिडिओ बनवला आहे.
हा व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यांनी अभिनेता पूरनचंद यांची मदत घेतली आहे. यात पूरनचंद यांनी अंतराळवीराचे काम केले आहे. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ स्थानिक नागरिकांसह सोशल मीडियावरही मोठ्याप्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तसेच, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रशासनावर टीकाही होत आहे. त्यामुळे बादल नानजुंदास्वामी यांच्या व्हिडिओची दखल घेत बंगळुरु महानगरपालिका शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करणार, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.