आसाम: साधं राहणीमान, मळकटलेले कपडे पाहून महिंद्राच्या शोरूममध्ये एका शेतकऱ्याचा तिथल्या कर्मचाऱ्यांनी अपमान केल्याची घटना गेल्याच महिन्यात घडली. आता नेमकी त्याऊलट घटना आसाममधल्या एका छोट्या दुकानदारासोबत घडली आहे. एक व्यक्ती दुचाकीच्या शोरूममध्ये गेला होता. त्याला दुचाकी खरेदी करायची होती. त्यासाठी तो पोत्यात भरून नाणी घेऊन गेला होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यानं त्याच्या कमाईतील पैसे दुचाकीसाठी साठवले होते.
यूट्यूबर हिरक जे. दास यांनी या व्यक्तीची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली. पेशानं दुकानदार असणाऱ्या व्यक्तीला स्कूटर खरेदी करायची होती. ते त्याचं स्वप्न होतं. स्कूटरसाठी तो अनेक महिन्यांपासून उत्पन्नातील काही पैसे बाजूला काढून ठेवत होता. स्कूटर खरेदीसाठी आवश्यक असलेली रक्कम जमा झाल्यावर त्यानं शोरूम गाठलं. पोत्यात चिल्लर भरून तो शोरूममध्ये गेला.
पोतं घेऊन शोरुममध्ये आलेल्या व्यक्तीला पाहून सगळेच चकीत झाले. घरखर्चातून बचत केलेल्या रकमेतून स्कूटर खरेदी करण्यासाठी आल्याचं दुकानदारानं तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर शोरुममधील कर्मचारी सुट्टे पैसे मोजायला बसले. दुकानदारानं आणलेल्या पोत्यात १, २ आणि १० ची नाणी होती. रक्कम भरल्यावर आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर दुकानदाराला स्कूटरची चावी देण्यात आली.
व्हायरल व्हिडीओमध्ये नाण्यांनी भरलेलं पोतं तीन व्यक्ती उचलत असल्याचं दिसत आहे. नाणी प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये ठेवण्यात आली. मग त्यांची मोजदाद सुरू झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये दुकानदाराचं नाव सांगण्यात आलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ अनेकांना भावला आहे.