आयुषमान खुरानाच्या 'बाला' सिनेमात एक डायलॉग आहे. ज्यात तो म्हणतो की, तुम्ही लठ्ठ असाल, काळे असाल, तुम्हाला टक्कल असेल किंवा तुम्ही बुटके असाल....कसेही दिसत असाल...जर तुम्ही स्वत:वर प्रेम कराल तर जगही तुमच्यावर प्रेम करेल...या डायलॉगवर अनेक टाळ्याही पडल्या होत्या. पण खरंच असं असतं का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण असं जर असतं तर एका ९ वर्षाच्या मुलावर मरण्याचा विचार करण्याची वेळ आली नसती.
ऑस्ट्रेलियातील या ९ वर्षांच्या मुलाचा एक व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे. तर जगातले लोक त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. पण ही तिच दुनिया आहे जिथे उंची, रंगावरून लोकांची खिल्ली उडवली जाते. अनेकदा ही खिल्ली इतकं गंभीर रूप घेते की, समोरची व्यक्ती जीवन संपवण्याचा विचार करू लागते. या ९ वर्षाच्या Quaden Bayles नावाच्या मुलासोबत तेच झालंय.
Quaden च्या आईने काही दिवसांपूर्वी एक फेसबुक लाइव्ह केलं होतं. यात हा मुलगा कारमध्ये आहे. तो झटपटत आहे. रडत आहे. आईला म्हणतोय की, मला चाकू दे, मला मरायचं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या मुलाला Achondroplasia नावाचा आजार झाला आहे. त्यानेच काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
त्याची आई म्हणाली की, 'शाळेत माझ्या मुलाच्या उंचीवरून त्याची फार खिल्ली उडवली जाते. त्यामुळे तो स्वत:वर नाराज झाला आहे'. तिने प्रश्नही विचारला आहे की, 'तुम्ही तुमच्या मुलांना, परिवाराला आणि मित्रांना असंच शिकवणार का की, त्यांनी दुसऱ्याची खिल्ली उडवावी?'. या व्हिडीओनंतर सोशल मीडियात #WeStandWithQuaden असा ट्रेन्ड सुरू झाला आहे. लोक अशाप्रकारची खिल्ली उडवणं थांबण्याची विनंती करत आहेत.
या लहान मुलाचा व्हिडीओ पाहून अनेकांचं मन हळवं झालं आहे. एक प्रसिद्ध कॉमेडीयन Brad Williams जे स्वत: बुटके आहेत. त्यांनी या मुलाला मदत करण्यासाठी एक मोहिम सुरू केली आहे. जेणेकरून त्याला डिज्नेलॅंडला पाठवता यावं. अनेकजण त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
जर तुमच्यासोबतही असं काही होत असेल तर खचून न जाता हिंमतीने सामना करा. कारण आयुष्य एकदाच मिळतं. काही मूर्ख लोकांच्या बोलण्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेणं मोठा मूर्खपणा ठरेल.