भारतात असलेली विविधता अनेक परदेशी पर्यटकांना आकर्षित करते. भारतातील डेटिंग संस्कृतीची जगभर चर्चा होत असते. भारतातील लोक इतर देशांच्या तुलनेत अधिक रोमँटिक असल्याचे बोलले जाते. आता सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाच्या एका तरुणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. संबंधित तरुणीने भारतातील डेटिंग संस्कृतीचे कौतुक करताना आपला अनुभव शेअर केला. ब्री स्टील नावाच्या ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने एका भारतीय तरुणासोबतचा डेटिंगचा अनुभव सांगितला. ब्री स्टील गेल्या एक वर्षापासून भारतातील विविध शहरांना भेट देत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिने भारतातील डेटिंग संस्कृती आणि ऑस्ट्रेलियाच्या डेटिंग संस्कृतीची तुलना केली.
ऑस्ट्रेलियातील तरुण विनोदी शैलीत फ्लर्ट करतात, खरे तर ते चुकीचे आहे. मात्र, भारतात प्रत्येकजण एकमेकांशी चांगला व्यवहार करतो असा माझा अनुभव आहे. मी एका पार्टीत गेली असता फ्लर्ट करताना एका मुलाने अचानक माझा हात धरला. पण ऑस्ट्रेलियात असे कधीच होणार नाही, असे ब्री स्टील ही तरुणी सांगते.
तिने आणखी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मी मुंबईत एका डेटिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. हा प्रसंग मला शाळेतील एका कार्यक्रमासारखा वाटला. अखेरपर्यंत महिला फक्त इतर महिलांशीच बोलत राहिल्या आणि पुरुषही तेच करत राहिले. त्यांच्याशी कोणीही मिसळत नव्हते. डेंटिंग ही संकल्पना भारतात अद्याप नवीन आहे असे मला जाणवले. भारतातील डेटिंग संकल्पनेवर बॉलिवूडचा खूप प्रभाव पडतो. अनेकांना पाहून चित्रपटातील एखादा रोमँटिक सीन आहे असे वाटते. स्क्रिप्टचे अनुसरण केल्यासारखे काहीजण वावरतात. मला वाटते की, इतर देशांच्या तुलनेत भारतातील डेटिंग संस्कृती फार वेगळी आहे. इथे बहुतांश ठिकाणी अरेंज मॅरेज होत असावेत असे दिसते. ऑस्ट्रेलियासारख्या देशात अनेक वर्षांपासून डेटिंगची संस्कृती आहे. तेथील शाळांमध्ये लैंगिक शिक्षणावर भर दिला जातो. भारतात सध्या तशी स्थिती नाही.