नवी दिल्ली : जगभरात विविध प्रकारची लोक आहेत. कोणाला कशाची आवड असेल आणि कोण कशाच्या मागे वेडे होईल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. हौस ही एक अशी गोष्ट आहे, जी माणसाला कोणत्याही थराला जायला भाग पाडते. सोशल मीडियावर नेहमी अशा भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण असते. सध्या एक ऑस्ट्रेलियन मॉडेल (Model) खूप चर्चेत आहे. अंबर ल्यूक (Amber Luke) या मॉडेलला टॅटू बनवण्याची एवढी नशा चढली होती की तिला आता बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. तिने तिच्या शरीरावरील ९९ टक्के भागात टॅटू काढले असून त्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत.
ऑस्ट्रेलियन मॉडेलने सांगितले की, टॅटू काढल्यामुळे तिचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तिला नोकरी करायची आहे पण कोणीच नोकरी देत नाही. तिने संपूर्ण शरीरावर टॅटू काढण्यासाठी आपल्या जीवनातील संपूर्ण कमाई घालवली. मात्र आता तिच्याकडे पैसे नसताना अशा परिस्थितीत तिला टॅटूमुळे कोणीच कामावर ठेवत नाही. तिने आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडली आहे.
शरीरावर टॅटू काढणं पडलं महागात ऑस्ट्रेलियन टॅटू मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबर ल्यूकने दावा केला आहे की, टॅटूमुळे माझ्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. तिने तिच्या शरीरावरील ९९ टक्के भागावर टॅटू काढला आहे. तिला टॅटू काढण्याची एवढी नशा चढली होती की डोळ्यांच्या पापण्यांना देखील रंग देण्यात आला आहे. यासाठी तिला काही वेळ अंध व्यक्ती प्रमाणे वावरावे लागले. विशेष म्हणजे तरीदेखील अंबर ल्यूकला या गोष्टीचा काहीच पश्चात्ताप झाला नाही.
ड्रॅगन गर्ल म्हणून प्रसिद्ध आपल्या अनोख्या शैलीमुळे अंबर ल्यूक ड्रॅगन गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे मात्र तिच्यावर बेरोजगारी देखील ओढवली आहे. अंबरने तिची ही व्यथा ब्रिस्बेन रेडिओ शोच्या कार्यक्रमामध्ये सांगितली, ज्या टॅटूसांठी तिने आपली सर्व कमाई खर्च केली त्याच टॅटूंमुळे बेरोजगारीचे संकट आले आहे.