कामावरून थकून आल्यानंतर तुम्ही विश्रांती करण्यासाठी तुमच्या बेडरूममध्ये गेला आणि त्याठिकाणी भलामोठा विषारी साप बेडवर दिसला तर काय होईल? नुसता विचार करूनही अंगावर काटा येत आहे. अशीच घटना ऑस्ट्रेलिया राहणाऱ्या एका महिलेसोबत घडली जी रूममध्ये गेली असता तिच्या बेडवर विषारी साप तिने पाहिला. बेडवर ६ फूट विषारी साप पाहून महिलेला धक्काच बसला.
CBS न्यूजनुसार, सोमवारी क्विसलँडमध्ये एका महिलेला बेडरूममध्ये बेडवर ६ फूटाचा भलामोठा साप दिसला. हा साप पाहून महिलेच्या अंगाचा थरकाप उडाला ती तातडीने तिथून पळाली. तिने तिच्या रुमचा दरवाजा बंद केला आणि सतर्कता बाळगत साप करणाऱ्या सर्पमित्राला बोलावले. महिलेने सांगितले की, मी बेडवरील चादर बदलण्यासाठी रूममध्ये गेली होती. पण बेडवर हा साप दिसला. अचानक सापाला पाहून मला घाम फुटला. मी लगेच तिथून बाहेर आले आणि रुमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर सर्पमित्राला फोन करून बोलावले.
सापाची सूचना मिळताच जॅचेरिज स्नेक एँड रेप्टाइल रिलोकेशनचे मालक रिचर्ड्स घटनास्थळी पोहचले. त्यांनी म्हटलं की, जेव्हा मी घटनास्थळी पोहचलो तेव्हा महिला माझी वाट पाहत होती. मी घरात जात बेडरूमच्या दिशेने गेलो. बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा तो साप बेडवरच झोपला होता आणि माझ्याकडे पाहत होता. उन्हापासून वाचण्यासाठी साप खिडकीतून घरात आला होता असं त्याने सांगितले. त्याचसोबत जर कुणालाही अशारितीने साप दिसला तर सर्वप्रथम त्याच्यापासून लांब जा आणि रेस्क्यू टीमला बोलवा असा सल्ला त्याने लोकांना दिला.
ऑस्ट्रेलियातील सर्वात विषारी सापापैकी एकजॅचेरिज स्नेक अँड रेप्टाइल रिलोकेशनने २० मार्चला फेसबुकवर ही घटना शेअर केली आहे. त्यात सापाचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यात लिहिलंय की, आज रात्री बेड चेक करा, सर्पमित्राने या सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडले आहे. 'ईस्टर्न ब्राउन' असं या सापाचे नाव असून तो ऑस्ट्रेलियातील दुसरा सर्वात विषारी साप आहे. याच्या विषात न्युरोटॉक्सिन असते. हा साप कुणाला चावला तर पीडिताच्या ह्दय, फुस्फुस आणि नसांमध्ये वेदना होतात. ज्यामुळे मृत्यूचा धोका संभावतो.