पावसाळा आता काही दिवसांवरच राहिला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवसआधी वेगवेगळ्या तयारीलाही लागतात. त्यात रेनकोट आणि छत्री या दोन महत्त्वाच्या असतात. भलेही छत्रीमुळे पावसापासून बचाव होत असेल पण अनेकांचे छत्री धरून धरून हात दुखू लागतात. पण विचार करा की, छत्री हातात धरावीच लागली नाही तर आणि आपोआप डोक्यावर उडत असेल तर...भारी ना....लवकरच अशी छत्री तुम्हाला लोकांच्या डोक्यावर उडताना बघायला मिळू शकते.
महिंद्रा अॅंन्ड महिंद्रा कंपनीचे मुख्य आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट शेअर केलं आहे. त्यात एक व्हिडीओ असून या व्हिडीओ एक ऑटोमॅटिक छत्री दाखवण्यात आली आहे. म्हणजे ही छत्री अशी तयार करण्यात आली आहे की, तुम्हाला ती धरावीच लागणार नाही. पण तरी सुद्धा ती तुमच्या डोक्यावर तरंगत राहणार आणि तुमचा पावसापासून बचाव करणार.
महिंद्रा यांनी हे ट्विट करताच भारतीय लोकांना प्रश्न पडला की, खरंच ही छत्री भारतात यशस्वी ठरू शकेल का? खासकरून मुंबईमध्ये. तसेच रस्त्याने चालताना केवढे अडथळेही असतात.
Dronebrella असं या छत्रीला नाव देण्यात आलं आहे. जपानमध्ये २०१८ मध्ये ही टेक्निक विकसित करण्यात आली होती. ड्रोनच्या मदतीने ही छत्री व्यक्तीच्या डोक्यावर उडत राहते. छत्रीचा हा प्रयोग जपानमध्ये तर यशस्वी झालाय. पण भारतात कितपत यशस्वी होईल हे तर लोकच सांगू शकतील.