मुरादाबाद : उत्तर प्रदेशमधील राजधानी लखनौ येथील लुलु मॉल आपल्या उद्घाटनासोबतच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलीकडेच या मॉलमध्ये नमाज अदा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर हा मॉल खूप चर्चेत आला आणि अनेक हिंदू संघटनांनी यावर आक्षेप घेतला. मॉलमध्ये नमाज अदा करत असल्याची घटना उघडकीस येताच हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने इशारा देत म्हटले होते की, जर मॉलमध्ये पुन्हा नमाज अदा केली गेली, तर त्यांना येथे सुंदर कांड पठण केले जाईल.
हिंदू संघटनांच्या तीव्र विरोधानंतर हा वाद चिघळत गेला आणि काही लोकांनी लुलु मॉलमध्ये घुसून हनुमान चालीसाचे पठण करण्यास सुरूवात केली. याची पोलिसांना माहिती मिळताच दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र आता समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान यांनी या मॉलबद्दल एक मजेशीर टिप्पणी केली आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मॉलच्या वादावर मी काय बोलू अस म्हणत त्यांनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं.
आझम खान यांच्या वक्तव्याने पिकला एकच हशा
लुलु मॉलमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केल्याने हा मॉल चर्चेचा विषय बनला. मॉल व्यवस्थापन आतमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक प्रार्थनेला परवानगी देऊ शकत नाही, अशी नोटीस लावल्यानंतरही मॉलमध्ये हनुमान चालीसा पठण सुरू असल्याचे दिसून आले. मॉलमधील प्रत्येक मजल्यावर यासंबंधीच्या नोटिसाही लावण्यात आल्या होत्या. त्याचवेळी, या घटनेनंतर लखनौचे पोलीस उपायुक्त यांची त्या ठिकाणाहून बदली करण्यात आली. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आझम खान यांनी काय आहे लुलु..लोलो..डूलू..डोलो... असं म्हणत या प्रकरणावर मजेशीर टिप्पणी केली आहे.