नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने अनेकांवर वाईट वेळ आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक अडचणींचा सामना हा लोकांना करावा लागत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. दिल्लीमध्ये एका 80 वर्षीय आजोबांनी आपल्या पत्नीसह 'बाबा का ढाबा' (Baba Ka Dhaba) सुरू केला आहे. आजोबांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मालविया नगरमध्ये 80 वर्षीय आजोबांनी 'बाबा का ढाबा' सुरू केला आहे. कोरोनाच्या काळात मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर हे जोडपं ढाबा चालवत आहे. एका यूट्यूबरने हा व्हिडीओ रेकॉर्ड करू शेअर केला होता. व्हिडीओमध्ये आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये ढाब्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. अवघ्या काही तासांत हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी आजोबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
सोशल मीडियावर 'बाबा का ढाबा' होतंय ट्रेंड
लोकप्रिय कलाकारांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा बाबा का ढाबाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर सध्या बाबा का ढाबा हे ट्रेंड होत आहे. क्रिकेटर आर अश्विननेही ट्विट करत या आजोबांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तो स्वत: देखील त्यांना मदत करणार असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी या दाम्पत्याच्या मदतीसाठी तपशील मागितले आहेत.
व्हिडीओ जोरदार व्हायरल, अनेकांनी दिला मदतीचा हात
कांता प्रसाद आणि बादामी देवी हे दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून आपलं छोटसं दुकान चालवत आहेत. या वृद्ध दाम्पत्याला तीन मुलं आहेत. मात्र कोणीच मदत करत नाही. त्यामुळेच ते ढाबा चालवतात. 80 वर्षीय आजोबा आपल्या पत्नीसोबत हा ढाबा चालवतात. मात्र आता लॉकडाऊनमध्ये त्यांच्या ढाब्यावर कोणीच येत नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बाबा का ढाबा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.