Balasaheb Thackeray Birth Anniversary, Viral Photo: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव आजही लोक आदराने घेतात. बाळासाहेबांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय न डगमगता घेतले. शिवसेना मुंबईसह राज्यभर वाढवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. पण सध्या याच शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरच्या फळीतील नेते व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली आहे. दोघेही पक्षावर दावा सांगत असून यावर निवडणूक आयोग निर्णय देणार असल्याचे सांगितले जात आहे. पण याच दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक चिमुरड्याचा फोटो चर्चेत आला आहे. हा चिमुरडा म्हणजे उद्धव किंवा राज ठाकरे नाहीत. या लहान मुलांचा थेट संबंध शिंदे गटाशी आहे. जाणून घेऊया, कोण आहे हा चिमुरडा...
ना राज, ना उद्धव मग नक्की कोण आहे हा लहान मुलगा?
बाळासोहब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्त एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील एका खास व्यक्तीचा. हा फोटो आहे बाळासाहेब ठाकरेंचा नातू निहार ठाकरे यांचा. निहार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यांचे वडील बिंदूमाधव यांचे १९९६ मध्ये अपघाती निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव हे निहार यांचे सख्खे काका तर राज ठाकरे हे चुलतकाका आहेत. निहार ठाकरे यांनी LLM पर्यंत शिक्षण घेतले आहे. सध्या वकिली करत आहेत.
फोटो कोणी केला पोस्ट?
निहार ठाकरे यांच्या बालपणीचा हा फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे. हा फोटो त्यांची पत्नी अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी पोस्ट केला आहे. अंकिता या माजी मंत्री आणि सध्याचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या दोघांचा फोटो पोस्ट केला आहे.
शिंदे गटाशी निहार यांचा थेट संबंध!
निहार ठाकरे हे वकील आहेत, त्यांची एक फर्मही आहे. एकनाथ शिंदे यांना कायदेशीर लढाईमध्ये जी काही मदत लागेल, त्यामध्ये मी शिंदे गटाच्या पाठीमागे उभा असेन असेही निहार ठाकरे यांनी म्हटले आहे. 'एकनाथ शिंदे यांना मी शुभेच्छा दिल्या असून बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जाणारीच खरी शिवसेना आहे,' असं निहार ठाकरे म्हणाले होते. तसेच, निहार ठाकरे हे शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतानाही दिसले आहेत. 'जे सत्य आहे, त्याचाच विजय होणार आहे', असा विश्वास त्यांनी वेळोवेळी व्यक्त करत शिंदे गटाची बाजू कायमच घेतली आहे.