Viral Video : आजच्या काळात सगळेच जण कुठे ना कुठे काम करून स्वतःचा आणि कुटुंबाचे पोट भरत असतात. काहीजण गावातल्या छोट्या कंपनीत काम करतात तर काही शहरातील मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात. बऱ्याच वेळा तुम्हाला असेही ऐकायला मिळते की कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करते ज्यामुळे त्या कर्मचाऱ्याला दिवसातून दोन वेळचे जेवण देखील मिळणे नशिबात नसतं. कामाचं टार्गेट पूर्ण न झाल्याने कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी आगपाखड करताना दिसत असतात. काही वेळा हे अधिकारी आपली पातळी सोडून कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मिडिया व्हायरल होतोय ज्यामध्ये कॅनरा बँकेचा मॅनेजर ऑनलाइन मीटिंगमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलताना आणि वागताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये कॅनरा बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संवाद होताना दिसत आहे. ४ मे रोजी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बॅँकेचा हा व्हिडिओ एका ऑनलाइन मीटिंगचा होता. यामध्ये एक मॅनेजर आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर प्रचंड चिडला होता. यासोबत सुट्टीच्या दिवशीही सक्तीच्या कामाचे आदेश देत आहे. ते काम न केल्यास कारवाईची धमकीदेखील मॅनेजरने दिली आहे.
गरीब बँकर नावाच्या एका नेटकऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेटकऱ्याने अर्थमंत्री, वित्त राज्यमंत्री आणि वित्तीय सेवा विभाग यांना टॅग केले. "तुम्हाला सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागेल. बँकेने तुम्हाला तुमच्या कुटुंबासह फिरण्यासाठी नोकरी दिली नाही, तुमचे कुटुंब खड्ड्यात जाऊदेत. मला काही फरक पडत नाही. कॅनरा बँक हे माझे कुटुंब आहे. माझे काय जातंय? बँकेने तुम्हाला नोकरी दिली आहे तर तुम्हाला काम करावचं लागेल. काम करण्यासाठी मी माझ्या कुटुंबाचा विचार करत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आठवड्यात सोमवार ते शनिवार या दरम्यान काम पूर्ण झाले नाही तर शनिवार, रविवार किंवा इतर कोणतीही सुट्टी असो, तुम्हाला काम करावे लागेल. आणि हे प्रत्येकासाठी आहे, मग तो अधिकारी असो किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा," असे मॅनेजर व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.
ही पोस्ट व्हायरल होताच कॅनरा बँकेकडून स्पष्टीकरण देखील आलं आहे. “बँक नेहमीच आपल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या योगदानाचा आदर करते. हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. बँक कोणत्याही विशिष्ट कर्मचाऱ्याच्या अशा वैयक्तिक वर्तनाला आणि वैयक्तिक मतांना मान्यता देत नाही. आम्ही आश्वासन देतो की योग्य कारवाई केली जाईल,” असे कॅनरा बॅंकने म्हटलं आहे.