जगातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' चा होस्ट अॅडव्हेंचरर बेअर ग्रिल्स याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला असून, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. मोदींसोबतचा फोटो ट्विट करताच ते व्हायरल झालं आहे. ग्रिल्सनं पोस्ट केलेला फोटो त्याच्या 'मॅन व्हर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स अँड पीएम मोदी' (Man vs Wild with Bear Grylls and PM Modi) या शो मधील आहे. जो २०१९ मध्ये शूट करण्यात आला होता. ट्विटरवर या शोच्या थ्रोबॅक फोटोबद्दल नेटिझन्स खूप चर्चा करत आहेत.
बेअर ग्रिल्सने सोमवारी ट्विटरवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि म्हटलं की, 'रेन फॉरेस्टमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या मजेदार आठवणी' तसंच त्यानं जंगलाचा अनुभव नेहमीच नवं काहीतरी देणारा असतो असंही म्हटलं आहे. याशिवाय या फोटोबाबत पडद्यामागचा किस्सा बेअर ग्रिल्सनं सांगितला आहे. पंतप्रधान मोदींसोबत ज्या राफ्टमध्ये तो नदी ओलांडत होता. त्या राफ्टला गळती लागली होती, असा खुलासा बेअर ग्रिल्सनं केला आहे. शो दरम्यान, पीएम मोदींनी बेअर ग्रिल्सला सांगितलं होते की त्यांनी त्यांच्या १८ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदा सुट्टी घेतली आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान मोदींसोबतचा साहसी बेअर ग्रिल्सचा शो शूट करण्यात आला होता. त्याच वर्षी १२ ऑगस्ट रोजी हा शो टीव्हीवर प्रसारित झाला होता. 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'चा हा एपिसोड भारतासह १८० देशांमध्ये रिलीज झाला होता. लोकांनी या एपिसोडचं खूप कौतुक केलं होतं. बेअर ग्रिल्सने दावा केला की हा एपिसोड ३.६ अब्ज सोशल इंप्रेशनसह 'जगातील सर्वात ट्रेंडिंग टेलिव्हिजन कार्यक्रम' बनला होता.