Social Viral : मुंबईसारख्या धावफळीच्या शहरात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेन्स किंवा बेस्ट बसेस हे समीकरण सर्वश्रुत आहे. भरगर्दीतून वाट काढत कामाच्या ठिकाणी तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकर हे पर्याय निवडतात. क्वचितच ऑटो किंवा बसमध्ये प्रवाशांना बसायला सीट मिळणे अवघडच असते. पण याउलट चित्र बंगळुरूमध्ये पाहायला मिळत आहे. फक्त एका प्रवाशासाठी रस्त्यांवर धावणाऱ्या बंगळुरूमधील एका बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बंगळुरूमधील या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
बंगळुरूमध्ये बीएमटीसीने ( बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट ) प्रवाशांसाठी 'वायू वज्र' ही विशेष बससेवा सुरू केली आहे. केंपेगौडा ते बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा मार्गावरून ही बस धावते. प्रवाशांना ट्रॅफिकच्या जाचातून मुक्त करत आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे हे बीएमटीसीचे उद्दिष्ट आहे. सध्या ही बससेवा चर्चेचा विषय बनली आहे. केवळ एका प्रवाशाच्या सेवेत ही बस नित्यनियमाने चालवली जाते. विशेष म्हणजे या बसमधून हा प्रवासी रोज प्रवास करतो.
सोशल मीडियावर या प्रवासी व्यक्तीने यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्वीटरवर बस कंडक्टरसह ड्रायव्हरचा फोटो शेअर करत या व्यक्तीने बंगळुरू बससेवेची माहिती दिली. हे दोघे मला माझ्या घरी सुखरूप पोहचवण्याचे काम करतात. या प्रवासात मला या दोघांची साथ मोलाची ठरते, अशी प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली आहे.
दरम्यान, या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवाय हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळते आहे.