पैसा असल्यावर माणूस काय शौक करने सांगता येत नाही. म्हणूनच म्हणतात, हौसेला नसते मोल. हौस करण्यासाठी माणूस कितीही पैसा किंवा संपत्ती खर्च करतानाची अनेक उदाहरणे आहेत. आता, असेच आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. तर, स्वत:चा चेहरा बदलून, लाखो रुपये खर्चून चेहऱ्याचा आकारही बदलल्याची अनेक उदाहरणे आहेत. सुंदर दिसावे म्हणून हा प्रयत्न गर्भश्रीमंत लोकांकडूनच केला जातो. एका विदेशी महिलेनंही बार्बी डॉलसारखं सुंदर दिसण्यासाठी असाच प्रयोग केला होता. मात्र, जपानमधील एका व्यक्तीची गोष्टच निराळी आहे.
येथील एका व्यक्तीने चक्क कुत्र्याच्या रुपात स्वत:ला बदलून घेतले आहे. ऐकल्यानंतर हे आश्चर्यकारक किंवा गंमत वाटेल. पण, हे खरं आहे. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, टीव्ही जाहिराती आणि चित्रपटांसाठी पोशाख बनवणाऱ्या पेट कंपनीने (Zepette) माणसांसाठी कुत्र्याचा पोशाख बनवला आहे. ही कंपनी मूर्ती, बॉडी सूट, ३ डी मॉडेल बनवण्यात स्पेशालिस्ट आहे. म्हणूनच, हा कुत्र्याचा बॉडीसूट बनविण्यासाठी कंपनीने ४० दिवस खर्च केले.
ट्विटरवर ब्योर-क्योर @curebore नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये कुत्रा बनलेल्या माणसाची माहिती दिली आहे. टोको नावाने ओळख असलेल्या जपानच्या एका व्यक्तीने १६ हजार डॉलर (१३ लाख रुपये) खर्चून कुत्रा बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्याने आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांपासून स्वत:ची ओळख लपवून ठेवली आहे. २९ जुलै रोजी शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओतून दिसून येते की, टोकोच्या गळ्यात पट्टा घालण्यात आला आहे. तसेच, इतर पाळीव प्राण्यांप्रमाणे तो जमिनीवर बसला असून त्यासोबत एक महिलाही आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला काही तासांतच २ मिलियन्सपेक्षा जास्त व्हयूज मिळाले आहेत. तर, नेटीझन्सही कमेंट करुन आपली प्रतिक्रिया व्हिडिओवर देत आहेत. त्यामुळे, हा व्हिडिओ आणि कुत्रा बनलेल्या माणसाची कथा चांगलीच व्हायरल झाली आहे.