बिहार बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासण्याचं काम सध्या सुरू आहे. यावेळी अनेक उत्तरपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरांऐवजी चुकीच्या गोष्टी लिहिल्या आहेत. उत्तरपत्रिकांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. कुणी उत्तरपत्रिकेत प्रेमाचे शब्द लिहिले आहेत तर कुणी राम भजन लिहून चांगले गुण मागितले आहेत. उत्तरपत्रिकांचे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.
विद्यार्थ्यांनी प्रश्नांच्या उत्तरांऐवजी गाणी आणि गोष्टी लिहिल्या आहेत. परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला होता, तर त्याच्या उत्तरात विद्यार्थ्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे लिहिली आहेत. याशिवाय प्रश्नांना उत्तर देताना विद्यार्थ्याने राम भजनातील 'अवध में एक दिन ऐसा आया...' या ओळी लिहिल्या आहेत. शेवटी जय श्री राम आणि जय सीता मैया असं देखील लिहिलं आहे.
बोर्डाच्या एका उत्तरपत्रिकेत विद्यार्थिनीने वडिलांच्या मृत्यूचे कारण देत फोन नंबर मागण्याचा प्रयत्न केला असून उत्तराऐवजी प्रेमळ शब्दही लिहिले आहेत. विद्यार्थिनीने पेपरमध्ये लिहिलं की "मी ज्योती आहे... सर कृपया माझे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे सांगणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला माहित आहे की तुम्ही सर्वजण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, सर, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे, दहा दिवस झाले आहेत आणि मी कोणताही अभ्यास पूर्ण केलेला नाही आणि माझी तब्येत ठीक नाही. तरीही मी परीक्षा द्यायला आले, प्लीज सर मला फोन नंबर द्या, प्लीज सर माझी प्रकृती खूप वाईट आहे. मला आशा आहे की सर तुम्हाला समजलं असेल."
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पेपरबाबत विचारलं असता परीक्षक अन्नू कुमारी म्हणाल्या की, आम्हाला तपासादरम्यान अशा उत्तरपत्रिकाही सापडल्या आहेत, परंतु काही चांगल्या आणि उत्कृष्ट उत्तरपत्रिकाही सापडल्या आहेत. काही उत्तरपत्रिका अशाही सापडल्या आहेत ज्यात मुलांनी शिक्षकांना भावनिक रित्या जोडून "कृपया सर मला मदत करा, कृपया उत्तीर्ण करा किंवा आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करा" असे लिहिले आहे. मात्र याचा परिणाम परीक्षकांवर होत नाही.