सध्या यूट्यूबवर एका गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत. हा व्हिडीओ दक्षिण कोरियाचा पॉप बॅंड 'ब्लॅकपिंक' च्या मुलींचा आहे. 'किल दिस लव्ह' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं कोरियाई आणि इंग्रजी भाषेत त्यांनी गायलं आहे. या गाण्यामुळे ब्लॅंकपिंक हा यूट्यूबवर १० कोटी व्ह्यूज मिळणारा पहिला बॅंड ठरला आहे. इतकेच नाही तर या चार मुलींना गंगनम स्टाइलने सर्वांना वेड लावणारा पॉप स्टार 'साई' चा रेकॉर्डही तोडला आहे.
ब्लॅकपिंकच्या या गाण्याला २४ तासात ५६.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर या गाण्याला हा ऐतिहासिक रेकॉर्ड कायम करण्यासाठी २ दिवस आणि १४ तासांचा कालावधी लागला. तसेच या मुलींच्या व्हिडीओने सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या एरियाना ग्रांडेच्या थॅंक्यू गाण्यालाही मागे टाकले आहे.
ब्लॅकपिंक बॅंड हा चार मुलींनी मिळून २०१६ मध्ये तयार केला. या मुलींची नावे जिसू, जेनी, रोज आणि लीसा आहेत. त्यांनी २०१६ मध्ये स्क्वायर वन नावाचा पहिला अल्बम काढला होता. त्यानंतर त्यांचं २०१८ मध्ये 'डू डू डू डू' हे गाणं आलं होतं, जे दक्षिण कोरियात सर्वात जास्त पाहिलं जाणारं गाणं ठरलं होतं.