Kitchen Hacks : रोजची वेगवेगळी कामे करत असताना आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येत असतात. अशात त्या अडचणींवर ठोस उपाय शोधण्याऐवजी बरेच लोक दुर्लक्ष करून पुढे निघून जातात किंवा काही कामे चुकीच्या पद्धतीनेच करत राहतात. किचनमधील कामे करताना अनेकदा वेगवेगळ्या समस्या येतात. किचनमधील रोज होणारी ही समस्या दूर करण्याची टिप्स देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बटाट्यांची भाजी तर दर एक दिवसआड भारतीय घरांमध्ये बनवली जाते. बटाटे उकडून वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते. तुम्हालाही अनुभव आला असेल की, उकडलेले बटाटे सोलताना हातांना चटके लागतात. हीच समस्या दूर करण्याची एक ट्रिक समोर आली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक महिला उकडलेला बटाटा हाताला चटके न लागू देता सोलत आहे. ती पुरी तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाळणीने बटाट्याची साल वेगळी करत आहे. अशाप्रकारे वेळही वाचेल आणि हाताना चटकेही लागणार नाही.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर aroob_jattoii नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे या व्हिडिओला आतापर्यंत २.३ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. तसेच अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.