कॅन्सर एक असा आजार आहे, ज्याचं नाव ऐकूनचं लोक घाबरून जातात. सध्या देशासह जगभरामध्ये कॅन्सरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. अनेकदा या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती आपली जगण्याची इच्छाच संपवून टाकतात. सतत शरीरावर होणारा औषधांचा भडिमार आणि वेदनादायी ट्रिटमेंटमुळे त्यांना अगदी नकोसं झालेलं असतं. पण 28 वर्षांची वैष्णवी इंद्रण पिल्लई कॅन्सर पीडित लोकांचा आणि खासकरून महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी एक उत्तम उदाहरण ठरली आहे.
वैष्णवी स्वतः या जीवघेण्या आजाराने ग्रस्त आहे. वैष्णवी इंद्रण पिल्लई इंस्टाग्रामवर नवि इंद्रण पिल्लई या नावाने ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच वैष्णवीने 'द बोल्ड इंडियन ब्राइड' या नावाने एक ब्राइडल फोटोशूट केलं असून हे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. ब्राइडल लूकमध्ये वैष्णवीचे बे फोटो समोर येताच ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
वैष्णवीने आपलं ब्राइडल फोटो शूट लाल रंगाच्या साडीमध्ये केलं आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये तिने मांग टिका आणि हेव्ही ज्वेलरी परिधान केली आहे. याव्यतिरिक्त काही फोटोंमध्ये तिने डोक्यावर पांढरी चुनरी घेऊन पोज दिली आहे. तिने केलेला हा ब्रायडल लूक क्लासी आणि स्टनिंग आहे.
नववधूप्रमाणे सजलेल्या वैष्णवीने हातांमध्ये बांगड्या घातल्या असून तिने हात आणि पायांवर मेहंदी काढली आहे. तिचा हा नववधू लूक तिच्यावर फार सुंदर दिसत आहे.
तिने फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना सांगितलं की, सर्वच तरूणींची इच्छा असते आपल्या लग्नाच्या दिवशी सुंदर दिसावं अशी असते. परंतु कॅन्सरने ग्रस्त असल्यामुळे अनेकजणी आपली ही इच्छा संपवून टाकतात. हे फोटोशूट करण्यामागे तिचा उद्देश, कॅन्सरने ग्रस्त असलेल्या महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांनीही स्वत:ला निरोगी महिलांप्रमाणे बोल्ड आणि सुंदर समजावं असाच आहे.
कॅन्सरने पीडित असणाऱ्या वैष्णवीने आपल्या एका पोस्टमध्ये लिहीलं आहे की, 'कॅन्सरसारखा आजार आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांमुळे त्यांच्या अनेक प्रकारची बंधनं येतात. आमच्या सौंदर्यालाही जणू ग्रहणचं लागतं. एवढचं नाही तर आमचा आत्मविश्वासही हळूहळू नष्ट होतो. लग्न म्हणजे मुलींच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो. आपल्या या आनंदाच्या क्षणी आपण सर्वांपेक्षा सुंदर दिसावं असं वाटत असतं.' वैष्णवीने पुढे लिहीलं आहे की, 'परंतु कॅन्सरमुळे अनेक महिला आपली ही इच्छा संपवून टाकतात. अनेक महिला तर लग्न करण्याचा विचारच मनातून काढून टाकतात.'
दरम्यान, वैष्णवीला दुसऱ्यांदा कॅन्सर झाला असून 2013मध्ये तिला पहिल्यांदा स्टेज-3 ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समजलं होतं. त्यावेळी ती 22 वर्षांची होती आणि ग्रॅज्युएशन करत होती. योग्य उपचार घेतल्यानंतर 2015मध्ये ती यातून पूर्णपणे बरी झाली होती. यानंतर तीने नोकरी करण्यास सुरुवात केली होती. परंतु जुलैमध्ये मलेशिया येथे करण्यात आलेल्या हेल्थ चेकअपमध्ये तिला समजलं की, ती पुन्हा कॅन्सरच्या कचाट्यात सापडली आहे. यावेळी तिला मणक्याच्या हाडाचा (Backbone) कॅन्सर झाला होता.
वैष्णवीने सांगितले की, तिला वाटलं होतं की, तिने कॅन्सरला हरवलं आहे, पण तो गैरसमज होता. खूप साऱ्या कीमोथेरपी केल्यानंतर 2018मध्ये तिने पुन्हा एकदा कॅन्सरवर मात केली. कॅन्सपर पीडित असण्यापासून कॅन्सरपासून सुटका होइपर्यंतचा तिचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. पण तिने हार मानली नाही.'
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये वैष्णवीने लिहिलं आहे की, कॅन्सरमुळे पीडित होण्याआधी मी प्रेम करत असलेल्या व्यक्तीसोबत लग्नाची स्वप्न रंगवत होते. मी नेहमीच हा विचार करायचे की, जेव्हा मी नववधु साज करेल त्यावेळी मला काय वाटत असेल. परंतु कॅन्सर ट्रिटमेंटदरम्यान डोक्यावरचे केस जाणं हे माझ्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे होतं. महिलांचे केसचं त्यांच्या सौंदर्याचं प्रतिक असतं. पण जेव्हा तेच तुमच्यापासून दूर जातात. त्यापेक्षा वाईट असं दुसरं काहीच नसतं. पण आपण आलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे आहे त्यातचं खूश राहणं गरजेचं असतं.'
दरम्यान, नवि इंद्रण पिल्लई मलेशियामध्ये राहत असून ती मोटिवेशनल स्पीकर आणि डान्सर आहे.
पाहूयात नवि इंद्रण पिल्लईचे आणखी काही फोटो :