ऑफिसमध्ये वेळेवर येणं हा नियमही असतो आणि प्रोफेशनलिज्मचा भागही असतो. परंतु अनेकदा ट्रेन, बस किंवा इतर काही वैयक्तिक कारणांमुळे असे प्रसंग येतात की कर्मचाऱ्यांना ऑफिसला यायला 5 ते 10 मिनिटं उशीर होतो. बर्याच ठिकाणी कर्मचार्यांना 15 मिनिटांपर्यंत उशिरा येण्याची परवानगीही दिली जाते. परंतु सध्या एका ऑफिसच्या अतिशय विचित्र नियमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये एका बॉसने कर्मचार्यांना 1 मिनिटही उशीर झाला तरी कडक शिक्षेची घोषणा केली आहे.
डेली स्टार वेबसाईटच्या रिपोर्टमध्ये सोशल मीडिया साइट Reddit वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टचा उल्लेख आहे. या पोस्टबद्दल सांगण्यापूर्वी, ही एक व्हायरल पोस्ट आहे हे स्पष्ट करणं आवश्यक आहे, त्यामुळे ही पोस्ट खरी असल्याचा दावा करत नाही. Reddit वर, एका युजरने त्याच्या ऑफिसमध्ये बॉसने जारी केलेल्या एका नियमाबद्दल सर्वांना सांगितलं, जे समजल्यावर लोक हैराण झाले आहेत.
व्यक्तीने ऑफिसमध्ये लावण्यात आलेली एक नोटीस शेअर केली आहे. यावर लिहिलं आहे - "आजपर्यंत मी जिथे जिथे काम केलं, त्यातील ही सर्वात वाईट जागा आहे. सॅलरीही कमी आहे." या नोटीसमध्ये लिहिलं आहे की जर तुम्हाला ऑफिसमध्ये यायला 1 मिनिटही उशीर झाला, तर तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर 10 मिनिटं जास्त काम करावं लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 10 वाजून 2 मिनिटांनी ऑफिसमध्ये आला तर तुम्ही 6 वाजून 20 मिनिटांनीच ऑफिसमधून बाहेर पडू शकता.
पोस्टवर 70 हजारांहून अधिक लाईक्स आले असून हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की हा अतिशय मूर्ख आणि बेकायदेशीर नियम आहे. आणखी एकाने विचारलं की बॉसला त्याचे कर्मचारी गमावायचे आहेत का, कारण कर्मचारी गमावण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. एकाने विचारलं की जर कोणी सकाळी 9 वाजून 58 मिनिटांनी कार्यालयात प्रवेश केला तर त्याला 5 वाजून 40 मिनिटांनी ऑफिसमधून निघण्याची परवानगी दिली जाणार का? एकाने तर यावर अतिशय अनोखी कल्पना मांडली. त्याने म्हटलं की कर्मचाऱ्याने एक तास उशिरा यायला हवं. यानंतर नियमानुसार जास्त काम करून ओव्हरटाईमचा दावा करत कंपनीकडून पैसे घ्यायला हवे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.