अलीराजपूरमधील आदिवासी पुरूषाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 06:11 PM2022-07-18T18:11:49+5:302022-07-18T18:14:00+5:30
मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे.
अलीराजपूर ।
मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे. आपल्या दोन्ही पत्नींचा विजय होताच माजी सरपंचाने दोन्ही पत्नींसोबत गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना ३५ वर्षीय माजी सरपंच समरथ मोरया यांनी सांगितले की, माझ्या तिसऱ्या बायकोने देखील निवडणुक लढवावी अशी माझी इच्छा होती. मात्र यासाठी तिसऱ्या पत्नीला तिची शिक्षण विभागातील शिपायाची नोकरी सोडावी लागली असती म्हणून ती निवडणुकीस मुकली.
३ पत्नी असणारा माजी सरपंच
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून ४०० किलोमीटर आणि अलीराजपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १४ किमी अंतरावर असलेल्या नानपूर गावचे रहिवासी समरथ यावर्षीच्या ३० एप्रिल रोजी खूप चर्चेत आले होते. कारण त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सकरी (२५), मेला (२८) आणि नानीबाई (३०) या तीन महिलांशी अधिकृतपणे विवाह केला.
समरथ हे सध्या ३ मुले आणि ३ मुलींचे बाबा आहेत. त्यांनी सांगितले की ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. "मी २००३ मध्ये नानीबाई, २००८ मध्ये मेला आणि २०१७ मध्ये सकरीशी विवाह केला आहे. यावर्षी ३० एप्रिल रोजी नानपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात मी त्यांच्याशी अधिकृतपणे लग्न केले." अशी माहिती माजी सरपंच समरथ यांनी दिली.
विजयामुळे आनंदच आनंद
लक्षणीय बाब म्हणजे समरथ लग्न केल्यानंतर देखील जेवढा खुश झाला नाही तेवढा निवडणुक जिंकल्यानंतर झाला आहे. तो दिवसरात्र पार्टीमध्ये रमला असल्याचं त्याचा मित्र जितेंद्र वाणीने पीटीआयशी संवाद साधताना सांगितले. अलीराजपूरचे रहिवासी भदौरिया म्हणाले की, त्यांचे विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार होत नाहीत. दरम्यान या माजी सरपंचाची सर्वत्र चर्चा रंगली असून ही निवडणुक सर्वांचे लक्ष वेधत आहे.