सोशल मीडियावर लहान मुलांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शाळेत पेन्सिल चोरीला गेल्यानंतर सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं भांडण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पेन्सिल चोरीची तक्रार करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ पोलिसांनी चित्रित केला. पोलिसांनी चिमुरड्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान चित्रित करण्यात आलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट त्यांच्यासोबतच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. कुरनुल जिल्ह्यातील कुडबुरू पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेचा व्हिडीओ आंध्र प्रदेश पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. एक मुलगा अनेक दिवसांपासून पेन्सिलची निब चोरत असल्याचा दावा मुलानं केला. पोलिसांनी याची दखल घेऊन तक्रार दाखल करावी अशी मागणी लहानग्यानं केली.
पोलिसांनी शांतपणे मुलाची तक्रार ऐकून घेतली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरू लागल्यावर पोलिसांनी त्याला समजावलं. तू तुझ्या मागणीचा पुन्हा विचार कर. दोषी मुलाला तुरुंगात जावं लागल्यास त्याचं आयुष्य अवघड होईल, अशा शब्दांत पोलिसांनी मुलाची समजूत काढली. आरोप करणाऱ्या आणि आरोप असलेल्या मुलांना पोलिसांनी हात मिळवण्यास सांगितला. त्यानंतर सगळीच मुलं हसू लागली.
हात मिळवल्यानंतरही मुलानं तक्रार दाखल करून घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर पुन्हा त्याची समजूत काढली. असा अपराध पुन्हा त्या मुलाच्या हातून होणार नाही अशा शब्दांत पोलिसांनी तक्रारकर्त्या मुलाला समजावलं. पोलिसांनी आरोप असलेल्या मुलाचीही समजूत घातली. यापुढे चांगला अभ्यास कर असं पोलिसांनी त्याला सांगितलं.