सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला चोरांपासून वाचवताना दिसत आहे. आईची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्याने केला होता. या मुलाने चोराला चांगलाच धडा शिकवला. हिरोसारखी त्याने आपल्या आईला मदत केली. गुडन्यूज मूव्हमेंट या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 2 मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. मोठ्या संख्येने लोक व्हिडीओ शेअरही करत आहेत.
व्हिडिओमध्ये एक महिला आणि तिचा मुलगा एकमेकांचा हात धरून फुटपाथवरून चालताना दिसत आहे. याचदरम्यान, रस्त्यावर दोन व्यक्ती दिसतात, त्यापैकी एक बाईकवर बसलेला आहे, तर दुसरा रस्त्यावर उभा आहे. तो व्य़क्ती लाल टी-शर्टमध्ये आहे. जवळून एक महिलाही बॅग घेऊन जाताना दिसते. आई आणि मुलाला पाहून लाल टी-शर्ट घातलेली व्यक्ती पर्सवर हात मारतो, ती हिसकावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, याचदरम्यान मुलाने प्रसंगावधान दाखवत चोरट्याला धडा शिकवला. ही महिलाही आपल्या चोराला पळवून लावण्यासाठी मुलाला मदत करताना दिसत आहे.
पर्स यानंतर खाली पडते आणि चोरटा बाईकवरील दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचे दिसून येते. ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोक मुलाचे खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये आईची पर्स चोरण्याचा प्रयत्न करत असताना या मुलाची प्रतिक्रिया पाहा. तो संपूर्ण वेळ सतर्क राहतो असं म्हटलं आहे.
व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटले की, 'मुलाचे धाडस अप्रतिम आहे. आईने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ती पर्स फेकून दिल्यानंतर पर्सची पर्वाही केली नाही. दुसरा युजर म्हणाला, 'यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आले. या घटनेमुळे नाही तर आई आणि मुलगा या दोघांनी एकमेकांना दाखवलेल्या संरक्षणामुळे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.