आग्रा ते नवी दिल्ली रेल्वे ट्रॅकवरील मालगाडीच्या लोको पायलटच्या प्रसंगावधान राखल्याने एका चिमुरडीचा जीव वाचला आहे. मोठ्या भावाने आपल्या लहान बहिणीला खेळता खेळता समोरून येणाऱ्या रेल्वेसमोर फेकले. तेव्हा लोको पायलट इमरजन्सी ब्रेक लावत ट्रेन थांबवली त्यामुळे या २ वर्षाच्या चिमुरडीचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून रेल्वे प्रशासनाकडून या ट्रेन चालकाचं कौतुक केले जात आहे.
मराठीत म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी..याचाच प्रत्यय पुन्हा एकदा झाला आहे. नवी दिल्लीहून दुपारी २.३०च्या सुमारास निघालेल्या मालगाडीने बल्लभगड स्टेशन पार केले, तितक्यात समोर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला दोन अल्पवयीन मुले खेळत होती. त्यातील मुलाने लहान चिमुरडीला ट्रेनच्या समोर फेकले, मालगाडीच्या लोको पायलट दिवान सिंह आणि असिस्टेंट अतुल आनंदने हे दृश्य पाहिलं. त्यानंतर प्रसंगावधान राखत तातडीने इमरजन्सी ब्रेक लावण्यात आला.
मालगाडी थांबल्यानंतर लोको पायलट खाली पटरीवर उतरले, दैव बलवत्तर म्हणून ती २ वर्षाची चिमुरडी रेल्वे इंजिनाच्या चाकात अडकली होती. काही वेळात तिथे त्या मुलीची आई आली तिने हे पाहिल्यानंतर धक्काच बसला. त्यानंतर लोको पायलटने त्या चिमुरडीला सुखरुप बाहेर काढून तिच्या आईकडे सोपवलं. लोको पायलट दिवान सिंह यांनी त्या मुलीला बाहेर काढलं. या घटनेची माहिती पायलटने आग्रा येथील छावनी स्टेशनवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात लोको पायलटचं अनेकांनी कौतुक केले आहे. लोको पायलटच्या कामगिरीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. रेल्वेकडून लवकरच या दोन्ही चालकांचा सन्मान करण्यात येईल अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम आणि पीआरओ संजीव श्रीवास्तव यांनी दिली.