LAMBORGHINI Car Free: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत असतात. मात्र, नोएडातील एका लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्टने याबाबत कमालच केली. जेपी ग्रीन्सने इथे व्हिलासोबत एक लॅम्बॉर्गिनी कार देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रिअल इस्टेट एजंट गौरव गुप्ता यांनी याबाबतची एक पोस्ट शेअर केल्यानंतर या ऑफरची चर्चा रंगली आहे. गौरव गुप्ता यानी सांगितलं की, जेपी ग्रीन्सच्या या प्रोजेक्टमधील प्रत्येक व्हिलाची किंमत २६ कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.
त्यांनी लिहिलं की, "नोएडामध्ये २६ कोटी रूपयांचा एक नवीन व्हिला प्रोजेक्ट येत आहे. यात प्रत्येक व्हिलासोबत एक लॅम्बॉर्गिनी कार दिली जाणार आहे". गौरव गुप्ताने सांगितलं की, २६ कोटी रूपयांमध्ये केवळ व्हिलाची किंमत आहे. इतर चार्जेस जसे की, विशेष कार पार्किंगसाठी ३० लाख रूपये, पावर बॅकअपसाठी ७.५ लाख रूपये आणि गोल्फ फेसिंग व्हिला खरेदी करण्यासाठी ५० लाख रूपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. तसेच क्लब मेंबरशिपसाठी ७.५ लाख रूपये द्यावे लागतील.
या ऑफरवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी असाही अंदाज लावला की, यात कारची किंमत आधीच सामिल आहे आणि बिल्डर तरीही ५० टक्क्यांपेक्षा अधिक नफा कमावत आहे. भारतात लॅम्बॉर्गिनी उरूसची किंमत मॉडल आणि कस्टमायजेशनच्या आधारावर ४ कोटींपेक्षा अधिक असते.