सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्विटर युजर दादी चंद्रो तोमर यांनी शेअर केला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान दाखवून आजीचा जीव वाचवणाऱ्या या मुलाचा गौरव करायला हवा. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक आजी रसत्यावर चालत आहेत. अचानक भरधाव वेगात वळू त्या ठिकाणी येतो. त्यानंतर आजींना जोरात धडक देतो.
त्यामुळे क्षणार्धात आजी खाली कोसळतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वळू किती वेगानं आजींवर हल्ला करत आहे याचा अंदाज येईल. आजींना खाली पडलेल्या अवस्थेत पाहून एक लहान मुलगा त्या ठिकाणी येतो आणि वळूला पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. पण त्या चिमुरड्यावरही वळू आक्रमण करतो. त्यानंतर हा चिमुरडा आजीला वर उचलण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. चिमुरडा आजीला घेऊन उभं राहतो. त्यानंतर पुन्हा वळू त्यांना धडक देतो. त्यामुळे ते दोघेही खाली पडतात. त्यानंतर एक माणूस काठी घेऊन येतो आणि वळूला मारून पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे.
आपल्या आजीला वाचवण्यासाठी प्रसंगावधान दाखवून वळूचा सामना केल्यामुळे या चिमुरड्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ हरियाणातील महेंद्रगड येथिल आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखवेळा पाहिलं गेलं असून २९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. ७ हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. सध्याच्या काळात असं प्रेम कुठेही पाहायला मिळत नाही अशाही कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.