कुत्रा, बैल हे प्राणी पाळीवर प्राणी असले तरी ते माणसांसाठी खतरनाक ठरू शकतात. माणसांच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात. काही दिवसांपूर्वीच श्वानाने एका महिलेचा बळी घेतल्याची घटना घडली होती. दरम्यान आता एका बैलाने एका व्यक्तीवर अचानक केलेल्या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तसे बैलांच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. काही प्रकरणांमध्ये काही लोक स्वतः मुक्या जीवाला त्रास देतात आणि नको ते संकट स्वतःवर ओढवून घेतात. या घटनेत मात्र तसं काहीच नाही. व्यक्ती बैलालाही काहीच करत नाही. बैलही सुरुवातीला शांत आहे. पण अचानक त्याला काय होतं कुणास ठाऊक. जवळ उभ्या असलेल्या या व्यक्तीवर तो हल्ला करतो.
व्हिडीओत पाहू शकता, रस्त्यावर एक काळ्या रंगाचा बैल उभा आहे. त्याच्यापासून काही अंतरावर एक व्यक्ती उभी आहे. रस्त्यावरून गाड्या ये-जा करत आहेत. अचानक बैलाचं लक्ष जवळ उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे जातं. ती व्यक्ती पाठमोरी उभी असते. बैल त्याच्या मागे धावत जातो आणि मागून शिंगं घुसवतो. त्यानंतर त्याला आपल्या शिंगावर धरून हवेत उडवतो. जवळपास पाच फूट उंच हा तरुण उडाला. त्यानंतर बैलाने त्याला धाडकन जमिनीवर आपटलं.
व्यक्तीच्या मदतीला कुणीही आलेलं दिसत नाही. व्यक्ती स्वतःच तिथून उठते आणि रस्त्याच्या पलिकडे जाते. तिथल्या एका दुकानाबाहेर बसते. त्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. तो स्वतःच रुग्णालयात गेला आणि त्याने उपचार करवून घेतले. टीव्ही 9 हिंदीच्या रिपोर्टनुसार या व्यक्तीं नाव संजय वर्मा आहे, जो व्यापारी आहे. तो घराबाहेर फिरत होता. त्यावेळी बैलाने त्याच्यावर हल्ला केला.