पुणे: चालकाशिवाय धावणाऱ्या एका बुलेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पुण्यातल्या नारायणगाव येथील असल्याचं सांगितलं जात आहे. नारायणगावातल्या परेरा पेट्रोल पंपसमोर एक बुलेट धावताना दिसली. विशेष म्हणजे ही बुलेट चालकाशिवाय रस्त्यावर धावत होती. त्यामुळे पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुलेटच्या चालकानं एका व्यक्तीला धडक दिली. त्या धडकेमुळे बुलेटचा चालक जमिनीवर कोसळला. त्याचं बुलेटवरील नियंत्रण सुटलं. बुलेट विरुद्ध दिशेला गेली. त्या रस्त्यावरून एक मालवाहू वाहनं येत होतं. त्या वाहनाला बुलेटची धडक बसणार होती. मात्र नियंत्रणाबाहेर गेलेली बुलेट पाहून चालकानं ब्रेक दाबला. त्यामुळे बुलेट आणि वाहनाची धडक टळली.
बुलेट मालवाहू वाहनाला धडक न देता काही अंतरावरून गेली. विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेलेल्या बुलेटनं पुढील काही सेकंदांत तो रस्तादेखील सोडला आणि बाजूला जाऊन पडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. मात्र त्यात चालकाला झालेला अपघात दिसत नाही. अपघातानंतर घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे बुलेट चालकाशिवाय धावतेय की काय असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडला आहे.