लखनौमधील नदवा कॉलेजजवळ स्विगी बॅकपॅकसह बुरखा घातलेल्या महिलेचा फोटो कोणीतरी क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. काही वेळातच हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. यानंतर लोक फोटोबाबत वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. रुढी-परंपरा मोडून पुढे आल्याबद्दल काहींनी महिलेचं कौतुक केलं, तर काहींनी तिचा चेहरा न दिल्यामुळे तिला 'मिस्ट्री वुमन' म्हटलं. लोकांनी असेही विचारले की ही महिला खरोखरच स्विगी डिलिव्हरी एजंट आहे का? आता या व्हायरल फोटोचं सत्य समोर आलं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या या फोटोचे सत्य अखेर समोर आलं आहे. ४० वर्षीय रिझवाना असे बुरखा घातलेल्या महिलेचं नाव आहे. ती फूड डिलिव्हरी एजंट नाही, परंतु कुटुंबाचे पोट भरण्यासाठी इतरांच्या घरी घरकाम करते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याचं रिझवानाला कळालं तेव्हा तिनं तिच्या कामाची संपूर्ण माहिती दिली. तिने सांगितलं की ती दिवसभर लोकांच्या घरी घरकाम करायला जाते आणि यातून तिला १५०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. दरम्यान, ती दुपारी चष्मा, डिस्पोजेबल चष्मा आणि कपडे विकून दरमहा सुमारे ६,००० रुपये कमावते.
चार मुलांची आई आहे रिझवानारिझवाना जनता नगर कॉलनीत राहते. तिला चार मुलं आहेत. २२ वर्षांची मुलगी लुबना विवाहित असून ती तिच्या सासरी राहते, तर दोन मुली बुसरा आणि नसरा आणि मुलगा मोहम्मद हे तिच्यासोबत राहतात. मोहम्मद सर्वात लहान आहे.
स्विगी बॅग कुठून मिळाली?जेव्हा महिलेला स्विगी बॅकपॅकबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की तिला डिस्पोजेबल ग्लास आणि कप ठेवण्यासाठी मजबूत बॅगची आवश्यकता होती. रिझवानाच्या म्हणण्यानुसार, तिनं लखनौच्या डोलीगंज ब्रिजवर एका बॅग विक्रेत्याकडून ही स्विगी बॅग ५० रुपयांना विकत घेतली. या बॅगेत ती तिचे सर्व सामान ठेवते. ती दररोज सुमारे २० ते २५ किमीचा प्रवास करते.