यूट्यूबवर प्रसिद्ध असलेल्या अनिशा दीक्षितने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हि़डीओने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं आहे. यूट्यूबरने ही फसवणूक असल्याचं म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये अनिशा सांगते की, वांद्रा येथून ओला बुक केल्यानंतर ती कारमध्ये बसली तेव्हा ड्रायव्हर अचानक ढसाढसा रडू लागला. ड्रायव्हरने दावा केला की, त्याच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं आणि त्याचं पाकीट देखील हरवलं.
संपूर्ण प्रवासादरम्यान ड्रायव्हर वारंवार सुसाईड करण्याबाबत बोलू लागला. अनिशाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या विचित्र वागण्याने तिला संशय आला. अनिशाने एका अर्जंट कॉलसाठी थोडा वेळ थांबण्याची विनंती केल्यावर, ड्रायव्हरने वेगाने गाडी नेली. तेव्हा तिला पैसे उकळण्याचा हा काही नवीन मार्ग असू शकतो असं वाटलं. याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.
अनिशाच्या पोस्टनंतर, इतर अनेकांनीही त्याच ड्रायव्हरसोबतचे त्यांचे अनुभव शेअर केले आहेत, जे एकाच पॅटर्नसारखे दिसते. अनेक इन्फ्लुएन्सर्स आणि कन्टेंट क्रिएटर्स देखील असाच अनुभव सांगितला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, अनिशाला ओला वरून कॉल आला आणि ड्रायव्हरला काढून टाकण्यात आले आहे असं सांगितलं. तिने फॉलोअप व्हिडिओमध्ये पुढे स्पष्ट केलं की, 2021 पासून ड्रायव्हरला अनेक तक्रारी मिळाल्या आहेत, त्यामुळे हा स्कॅम बऱ्याच काळापासून चालू आहे.
अनेकांनी ड्रायव्हरच्या वागण्यावर टीका करत ओलाकडे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ही घटना वारंवार प्रवास करणाऱ्या लोकांसाठी चिंतेचे कारण बनत आहे. असे अनेक ड्रायव्हर असं नाटक करून पैसे उकळत असावेत, असे लोकांचे म्हणणे आहे. लोकांनी याबाबत तक्रार करणं खूप महत्त्वाचं आहे.