कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे चिंतेचं आणि सिरीअल वातावरण आहे. लोकांच्या मनात भीती आहे. हाच स्ट्रेस किंवा भीती दूर करण्यासाठी लोक सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. अशात सोशल मीडियातील लोकांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा एक व्हिडीओ चांगलाच पसंतीस पडला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात ते कोरोना व्हायरस संदर्भात बोलत होते. पण हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण त्यांचं कोरोनावरील मत नाही तर त्यांचं केस सावरणं हे आहे. ते बोलत असताना केस त्यांच्या कपाळावर येतात, हे केस ते एका खास अंदाजात मागे करतात. त्यांच्या याच अदावर सोशल मीडियातील लोक फिदा झाले आहेत.
हा व्हिडीओ Jason Hanson नावाच्या यूजरने फेसबुकवर शेअर केलाय. पंतप्रधान जस्टिन यांचा हा व्हिडीओ एडीट करण्यात आला आहे. त्यांची केस मागे घेण्याची अदा स्लो मोशनमधे दाखवण्यात आली आहे. 48 वर्षीय जस्टिन हे तीन मुलांचे वडील आहेत.
लोकांना जस्टिन यांची ही स्टाईल फारच पसंत पडली. आतापर्यंत त्यांचा हा व्हिडीओ 50 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय. 1 लाख 26 हजार लोकांनी लाइक केला तर 1 लाख 70 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.
दरम्यान, कोरोनाचा फटका कॅनडालाही मोठा बसला आहे. इथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 38, 422 झाली आहे. तर 1,834 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच 13,188 लोक आतापर्यत बरे झाले आहेत.