कारच्या धडकेनं इमारत कोसळल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? खोटं वाटलं पण, हे घडलंय. एका भरधाव कारने कोपऱ्यावर असलेल्या इमारतीला जोरान धडक दिली, यात इमारतीचा एक भाग पूर्णपणे कोसळला. इमारतीच्या सर्व विटा आजूबाजूला पडल्या, आत ठेवलेलं फर्निचरही रस्त्यावर आलं. या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टरमध्ये ही घटना घडली आहे. मेट्रो यूकेच्या म्हणण्यानुसार, काल संध्याकाळी एक वेगवान बीएमडब्ल्यू कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीवर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झालाच, पण इमारतीचा एक मोठा भागही कोसळला.
इमारतीच्या विटा रस्त्यावर विखुरल्या, गाडीही इमारतीत घुसली. इमारत कोसळताच आतमध्ये ठेवलेलं सामान बाहेर विखुरलं. गाडीमुळे इमारत कोसळल्याचं दृश्य पाहून उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीतील महिला चालकाची सुटका केली. ही महिला दारुच्या नशेत होती, त्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. सुदैवाने महिला पूर्णपणे सुरक्षित होती. तसेच, इमारतीत उपस्थित असलेले 2 जण घटना घडण्यापूर्वी तिथून निघून गेले होते, त्यामुळे या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.