उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर फाटक बंद असूनही, एक कार चालक जबरदस्तीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेमुळे कार रेल्वे ट्रॅकवर अडकली. कार अडकलेली पाहून गेटमनने कंट्रोल रुमला याबाबत माहिती दिली. त्यामुळे ट्रेन तातडीने थांबवण्यात आली.
ट्रेन सिग्नल पार करून फाटकाच्या दिशेने निघाली होती. त्यावर गेटमनने लाल झेंडा दाखवून रेल्वे क्रॉसिंगपूर्वी ट्रेन थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बुधवारी दुपारी 1.57 वाजता मोतिहारी-आनंद विहार एक्स्प्रेस ट्रेन (14009) चंदौसी येथून जात होती. अशा परिस्थितीत गेटमन संजीव कुमार रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक बंद करत होते. याच दरम्यान, स्विफ्ट डिझायर कार चालकाने घाईघाईने कार क्रॉसिंगमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, कार दोन फाटकच्या मध्ये ट्रॅकवर अडकली.
संजीव कुमार यांनीही ट्रॅककडे न पाहता गेट बंद केलं. इकडे कार ट्रॅकच्या मधोमध अडकली तेव्हा क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूला उभे असलेले लोक मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले. आवाज ऐकून गेटमन संजीव यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. यावर त्यांनी घाईघाईने कंट्रोल रुमला ट्रेन थांबवण्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत ट्रेन सिग्नल ओलांडून फाटकजवळ आली होती.
ट्रेन जवळ येत असल्याचं पाहून कार चालकाने कार ट्रॅकवरच सोडून पळ काढला. नंतर गेटमनने तातडीने एक्स्प्रेसला लाल झेंडा दाखवून थांबण्याचा इशारा दिला. जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा स्थानिक लोकांनी कार रेल्वे ट्रॅकवरून बाजुला केली आणि ट्रेन पुढे गेली. यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने गेटमनला सस्पेंड करण्यात आलं आहे. कारण, त्यांनी न बघता फाटक बंद केलं होतं. चंदौसी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक हरभजन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन जात असतानाच ट्रॅकवर स्विफ्ट डिझायर कार अडकली होती. त्यानंतर गेटमनने लाल झेंडा दाखवून ट्रेन थांबवली. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.