Cheetah Jungle Safari Viral Video: इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये हल्ली वन्यप्राण्यांचे व्हिडीओ जास्त असतात. पाळीव प्राणी असो वा जंगली श्वापद असो, सर्वच व्हिडीओ आपले मनोरंजन करत असतात. पण जंगलातील प्राण्यांच्या बाबतीत सर्वच व्हिडीओ तसे नसतात. काही व्हिडीओ श्वास रोखून धरायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ हे अतिशय पटकन लक्षात राहतात. सध्या असाच एक चित्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये चित्ता स्वत: पर्यटकांना फिरवण्यासाठी असलेल्या जीपच्या वर बसून जंगल सफारीची मजा लुटताना दिसतोय.
चित्ता हा प्राणी जंगलातील सर्वात वेगवान व चपळ प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघ, सिंह, बिबट्या पाहायला मिळत असले तरी चित्ता पाहायला मिळण्याचं भाग्य फारच कमी असतं. पण नुकत्याच एका पर्यटकांच्या ग्रुपला चित्ता अगदी जवळून पाहायला मिळाला. चित्ता इतक्या जवळून पाहणं हे भाग्य म्हणावं की जीव मूठीत धरून गप्प बसावं, अशी काहीशी परिस्थिती यांच्या ओढवली होती. पण चित्ता मात्र शिकार किंवा आक्रमक पद्धतीच्या मूडमध्ये नव्हता. चित्ता एका जंगल सफारी करणाऱ्या जीपच्या मागील बाजूच्या स्टेपनीवर चढला. काही काळ त्याने तिथेच उभं राहणं पसंत केलं. पण त्यानंतर मात्र तो थेट एक मोठी उडी मारून जीपच्या टपावर जाऊन बसला. पाहा नक्की काय घडलं त्याचा व्हिडीओ-
चित्ता अतिशय शांत मूडमध्ये असल्याने त्याने लोक दिसत असून आणि आसपास हालचाल होत असूनही कोणावर हल्ला केला नाही. चित्ता उडी मारून आधी टपाच्या बाजूच्या भागावर आला. त्यावेळी लोक फोटो काढण्यात व्यस्त होते. पण चित्ता आजूबाजूला बघत बसला. त्यानंतर चित्ता थेट उडी मारून टपावरच जाऊन बसला. टपाच्या बाजूच्या जागेतून एक मुलगी फोटो काढण्यासाठी वरच्या दिशेने आली, तरीही चित्त्याने त्यांच्यापैकी कोणालाही काहीच केलं नाही. तो टपावर शांतपणे बसून राहिला.
हा व्हिडीओ सुरेंदर मेहरा IFS यांनी आपल्या व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओला काही वेळातच ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.