जम्मू-काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद्यांचा धुमाकूळ सुरू असून निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. यातच भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी जोरदार ऑपरेशन सुरू आहे. यात अनेक जवानांना देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावावी लागत आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचे संपूर्ण देशभरात परिणाम दिसून येत आहेत. भारतीय जवान देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात आणि यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात भारतीय जवानांच्या प्रती जाज्ज्वल्य अभिमान असतो यात काहीच शंका नाही. सोशल मीडियात सध्या असाच एक हळवा आणि तितकाच अभिमानास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारतीय सैन्याचे जवान जिथं दिसतात तिथं त्यांचा सन्मान म्हणून त्यांना कडक सॅल्यूट ठोकून सन्मान सामान्य नागरिक करतानाचे अनेक व्हिडिओ याआधी आपण पाहिले आहेत. पण बंगलोर विमानतळावरील एका व्हिडिओनं सर्वांचं मन जिंकलं आहे. बंगलोर विमानतळावर एका चिमुकल्यानं विमानतळावरील सुरक्षेसाठी तैनात असलेलं सुरक्षा दलाचं वाहन पाहिलं. यात एक जवान हातात बंदुक घेऊन आपली ड्युटी करत होता. चिमुकल्यानं सुरक्षा वाहनाच्या समोर उभं राहून जवानाकडे पाहिलं आणि त्याला कडक सॅल्यूट ठोकला. चिमुकल्याच्या कृतीनं सैनिकाचाही उर नक्कीच भरून आला असेल. त्यानंही चिमुकल्यानं दिलेला सॅल्यूट स्विकारला आणि देशाच्या सुरक्षेप्रती सदैव तत्पर असल्याचं सांगत सॅल्यूट ठोकला.
देशातील जवानांच्या सेवेप्रती चिमुकल्यानं केलेल्या या कृतीचं सोशल मीडियात खूप कौतुक केलं जात आहे. चिमुकल्यानं अनेकांचं मन जिंकलं आहे. या व्हिडिओत चिमुकल्याच्या कृतीतूनच देशाच्या सैनिकांप्रतिच्या भावना व्यक्त होतात. व्हिडिओ जितका मन हळवं करतो तितकाच सैनिकांप्रती उर अभिमानानं भरुन येतो.