छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अनेकदा वादाचं रुपांतर हे पुढे हाणामारीत होतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मात्र जमिनीपासून हजारो फूट उंचीवर जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाला आहे. चीनमध्ये हा अजब प्रकार घडला आहे. टॉयलेटच्या वापर करण्यावरून विमानामध्ये पायलट आणि फ्लाइट अटेंडेंटमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एकाचा हात तुटला आहे तर एकाचा दात पडला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घटनेची माहिती मिळताच दोघांनाही निलंबित करण्यात आले असून उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चीनमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना 20 फेब्रुवारी रोजी घडली होती. नान्चाँगहून शियानसाठी विमानाने उड्डाण केले होते. विमान लँडिंग होण्याच्या 50 मिनिटांपूर्वी ही जोरदार हाणामारी झाली. विमानातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण होण्याआधी पायलट आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. एअरलाइन्सने या दोघांवर कारवाई केली आहे. मात्र त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
विमान उड्डाणानंतर पायलट विमानातील टॉयलेटचा वापर करत होता. त्याच वेळेस विमानातील प्रथम श्रेणीतील केबिनमधील प्रवाशालादेखील टॉयलेटचा वापर करायचा होता. पायलटने त्या प्रवाशाला काही वेळ प्रतिक्षा करण्यास सांगितले. मात्र प्रवाशाने पायलटच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पायलट टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर तो प्रवासी टॉयलेट बाहेरच उभा होता. त्यानंतर पायलटने प्रथम श्रेणीच्या केबिनची जबाबदारी असलेल्या फ्लाइट अटेंडेंट बोलावले आणि त्याला सुनावले.
योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे विमानाच्या सुरक्षितेला धोका निर्माण होई शकतो असं पायलटने म्हटलं आहे. फ्लाइट अटेंडेंटने आपली चूक नाकारत पायलटला विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद वाढून दोघांमध्ये हाणामारी झाली. ज्यामध्ये फ्लाइट अटेंडेंटचै हैत तुटला तर पायलटचा दात तुटला आहे. सोशल मीडियावर या हाणामारीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत कंपनीने दोघांवर कारवाई केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.