चीनच्या एका कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांसोबत अमानवीय व्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्याला दिलेलं काम पूर्ण न झाल्याने त्याला लघवी प्राशन करण्यासाठी भाग पाडलं. इतकंच नाही तर त्याला खाण्यासाठी झुरळ देण्यात आलं आणि ते खाण्यासाठी त्याच्यावर दबावही टाकण्यात आलाय.
मीडिया रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांची चूक हीच असते की, ते वेळेवर टार्गेट पूर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना बेल्टने मारझोड करण्यात येते. त्यांना लघवी प्राशन करणे आणि झुरळही खाण्यासाठीही भाग पाडलं जातं. या कंपनीचा प्रताप इतक्यावर थांबत नाही तर कंपनी टॉयलेटमध्ये हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मगने कर्मचाऱ्यांनी पाणी प्यायला सांगते. त्याहूनही धक्कादायक म्हणजे ही शिक्षा त्यांना एकट्यात नाही तर सर्व स्टाफसमोर दिली जाते आणि त्यांचा पगारही रोखला जातो.
कंपनीची नोकरी सोडल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी या घटनांची माहिती दिली. त्यांनी हेही सांगितलं की, जर चुकून कधी फॉर्मल कपडे किंवा शूज घालून कंपनीत गेलो नाही तर ५० युआन दंड द्यावा लागतो. या कंपनीच्या तीन मॅनेजरना स्टाफसोबत असा व्यवहार करतात म्हणून ५ ते १० दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला आहे.
ज्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर कंपनी चालते त्यांच्यासोबत अशाप्रकारचा व्यवहार करणे कोणत्याही दृष्टीने योग्य ठरवलं जाऊ शकत नाही. त्यामुळे सोशल मीडियातूनही या प्रकारावरुन कंपनीवर जोरदार टिका होत आहे.