आपण अनेकदा सिनेमात पाहतो की, एखाद्या कैद्याला चेकअपसाठी डॉक्टरकडे नेलं जातं आणि मग संधी मिळताच आधी प्लॅन करून तेथून कैदी पळून जातो. अनेक सिनेमांमध्ये असे सीन आपण पाहिले आहेत. पण असाच कारनामा एका महिला कैदीने केला. ही घटना कोलंबियातील असून येथील एक नेता पोलीस कस्टडीतून पळाली.
२०१८ मध्ये कोलंबियामध्ये निवडणुका सुरू होत्या, तेव्हा Aida Merlano ने 'मत विका' ही स्कीम सुरू केली होती. यामाध्यमातून तीन जागाही निवडून आल्या. या प्रकरणीच गेल्या महिन्यात ४३ वर्षीय मेरलानोला १५ वर्षांची शिक्षा झाली होती. ती तुरूंगात शिक्षा भोगत होती. पण जेव्हा तिने दात दुखत असल्याचं सांगितलं तर तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. नंतर कळालं की, दात दुखणं हा एक बहाना होता. तिला तिथून पळून जायचं होतं.
पोलीस याच आठवड्यात मेरलानोला बोगोटा(कोलंबियाची राजधानी) मध्ये डेंटिस्टकडे घेऊन गेले होते. इथूनच तिने फिल्मी स्टाईल पळ काढला. आता सोशल मीडियात तिचा पळून जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
डेंटिस्टच्या क्लिनिकमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली. व्हिडीओत तुम्ही तुम्ही महिलेला रूग्णाच्या खुर्चीवर बसलेली बघू शकता. जसे तेथील डॉक्टर आणि कर्मचारी तेथून बाहेर जातात, तेव्हा महिला कापडांची दोरी तयार करते आणि खिडकीतून फरार होते. खाली तिला घेण्यासाठी एक व्यक्ती बाइक घेऊन उभी असते. मेरलानो हेल्मेट घालून गायब होते.