रांची : झारखंडच्या राजकीय वर्तुळातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे कॉंग्रेस पक्षाच्या आमदार दीपिका पांडे सिंग यांनी रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आंघोळ केली आहे. राष्ट्रीय महामार्ग -133 वरील रस्त्याची स्थिती पाहून कॉंग्रेस आमदार नाराज होत्या. यामुळेच सरकारच्या निषेधार्थ त्यांनी अनोखे आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खराब रस्त्यामुळे इथे वारंवार अपघात होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यादरम्यान त्यांनी भाजपाचे स्थानिक खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
रस्त्याच्या दुरूस्तीसाठी केले अनोखे आंदोलन आमदार पांडे यांनी म्हटले, "जोपर्यंत रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील." या आदोंलनादरम्यान दीपिका पांडे यांनी स्थानिक महामार्गावरील वाहतूक काही काळ आडवून ठेवली होती. तसेच रस्ते बांधणी आणि दुरुस्तीचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, परंतु राष्ट्रीय महामार्ग-133 च्या दुरूस्तीचे काम सतत पुढे ढकलले जात आहे. या रस्त्याचे कंत्राट मे महिन्यात देण्यात आले होते, मात्र आजतागायत त्याचे काम सुरू झालेले नाही. असे आमदार दीपिका पांडे सिंग यांनी सांगितले.
भाजपा खासदारावर साधला निशाणा रांचीमधील गोड्डा येथील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यावर काँग्रेस आमदार दीपिका पांडे यांनी जोरदार निशाणा साधला. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम येथील खासदार निशिकांत दुबे यांनी करायला हवे होते, असे त्या म्हणाल्या. पण त्यांच्याकडून अपेक्षा करणे मूर्खपणाचे असून हे प्रकरण राज्य सरकारचे नाही, तरीही मी सीएम हेमंत सोरण यांना विनंती करते की त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याचा मार्ग काढावा. अशी मागणी आमदार पांडे यांनी यावेळी केली.