कोरोनाकाळात अनेकांना संकटांचा सामना कराव लागत आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगा जिल्ह्यातील रानीतालमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कोरोना संक्रमित महिलेच्या मृत्यूनंतर तिला खांदा द्यायला कोणीही पुढे आलं नाही. शेवटी एकट्या मुलानं मृतदेह आपल्या खांद्यावर उचलून घेत अंत्यसंस्काराचे काम पूर्ण केले. सदर कोरोना संक्रमित महिला भंगवार ग्राम पंचायतीतील माजी सरपंच होती. कोरोना संक्रमण झाल्यानं उपचाराआधीच त्यांनी घरीच प्राण सोडले. विशेष म्हणजे अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे आलं नाही.
भांगवार पंचायतचे प्रमुख सूरम सिंह म्हणाले की, ''मी आजारी होतो, म्हणून त्यांच्या घरी जाऊ शकलो नाही. प्रशासनाकडून पीपीई किटही मागवले होते. मृत व्यक्तीचा मुलगा विरसिंह यांनी सांगितले की, माझे नातेवाईक पीपीई किट घेऊन येत आहेत. मृतदेह उचलण्यासाठी २ ट्रॅक्टर चालकांशीही संपर्क केला पण त्यांनी काहीही ऐकले नाही.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''या कुटुंबास गावातील काही लोकांनी मदत केली आणि ते जंगलात लाकूड आणण्यासाठीही गेले. वीर सिंह यांचा एकट्याने मृतदेह नेण्याचा निर्णय चुकीचा होता. सदर घटनेतील मृत महिलेच्या मुलाच्या म्हणण्यानुसार कोणीही खांदा द्यायला तयार नसल्यानं त्याला एकट्याला मृतदेह घेऊन जाण्याची वेळ आली.
ना रुग्णवाहिका ना कोणाची मदत; भावडांनी बाईकवर दोरी बांधून नेला मृतदेह
मध्यप्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील मानपूरमध्ये उपचारासाठी आलेल्या एका आदिवासी तरूणाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोणतंही वाहन उपलब्ध न झाल्यानं नातेवाईकांनी बाईकवर मृतदेह ठेवत दोरी बांधून घेऊन गेले. उमरिया जिल्हा मुख्यालयापासून ४५ किलोमीटर दूर मानपूर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे. पतौर गावातील ३५ वर्षीय रहवासी असलेल्या एका व्यक्तीला अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला.
त्यानंतर नातेवाईक या तरूणाला घेऊन मानपूर विकासखंडाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. उपचार सुरू झाल्यानंतर काहीवेळातच या तरूणाचा मृत्य झाला. ज्यावेळी रुग्णालयातून कोणतीही मदत मिळाली नाही. म्हणून मृतदेह मोटारसायकलवर बांधून नेण्याची वेळ आली.
उमरिया जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी मानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याचं मान्य केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनेतील मृत व्यक्तीचे उपचार सुरू करण्यात आले होते. पण कोविड प्रोटोकॉल्सपासून बचावासाठी नातेवाईकांनी घाई करत मृतदेह नेला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत लवकरच रुग्णवाहिका दाखल केली जाणार आहे.