नवी दिल्ली - गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाविरुद्ध लढाईत भारताला लसीच्या माध्यमातून दिलासा मिळाला आहे. आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या कॉव्हॅक्सिन आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लसीला परवानगी दिली आहे. येत्या आठवडाभरात देशभरात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवात केली जाणार आहे.
मात्र तत्पूर्वी मंजुरी मिळालेल्या कोरोना लसीमध्ये पोर्कचे अंश असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. यावर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे माजी मुख्य डॉ. डी आर गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं आहे की, अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, या अफवा चुकीच्या आहेत. कोरोना लसीबाबत असलेल्या सोशल मीडियावरील मेसेजची सत्यता पडताळल्याशिवाय कोणीही पुढे फॉरवर्ड करू नयेत असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.
तसेच लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की, कोणत्याही लसीला मंजुरी देण्यापूर्वी एक प्रक्रिया पार पाडली जाते, संपूर्ण गोष्टीचा विचार करून त्याला परवानगी दिली जाते, कोरोना लस घेण्याचा नकार देणाऱ्यांनी हा विचार करावा की, ते स्वत:चं नुकसान करत नाहीत तर त्यांच्या कुटुंबालाही त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे, त्यांचे नातेवाईक, मित्र सगळेच अडचणीत येऊ शकतात असंही डॉ. आर गंगाखेडकर यांनी सांगितले.
त्याचसोबत आतापर्यंत जगभरातील १ कोटी लोकांना लस दिली आहे, यात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आढळलं नाही, काही लोकांना त्रास झाला परंतु त्यांचा त्रास दूर करण्यावर नियंत्रण मिळवलं, जर लोकांनी त्या घटना लक्षात ठेवल्या तर त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुमच्याकडे कोरोना लसीबाबत संशयास्पद मेसेज येत असेल तर तुम्ही कोरोना हेल्पलाईनवर फोन करून त्याची खातरजमा करू शकतात. त्यापूर्वी हे मेसेज फॉरवर्ड करू नयेत असं डॉ. गंगाखेडकर म्हणाले.
दरम्यान, काही ठिकाणी कोरोना लसीत पोर्कचे(डुक्कराचे मांस) घटक आहेत अशी चर्चा आहे, हे साफ चुकीचे आहे, दोन्ही लसीमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही, कोरोना लस घेणारे नपुंसक होतील ही फक्त अफवा आहे, या दाव्याला कोणताही आधार नाही, कोरोना लसीमुळे कोणीाही नपुंसक बनणार नाही, सध्या आपत्कालीन परिस्थिती आहे, अशावेळी चुकीचे मेसेज फॉरवर्ड करून गैरसमज पसरवू नये असंही डॉ. आर गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.