मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेली कोरोनावर तयार केलेली कोविशील्ड लस आता देशभरात पोहोचली आहे. पुढील काही दिवसांत देशात लसीकरणास प्रारंभ होईल. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच महिन्यापासून कोरोनाचा नायनाट सुरू होईल. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईनवर्कर्स यांना लस दिली जाईल. त्यानंतर पन्नाशी पार केलेल्या आणि गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना लस देण्यात येईल. काल पुण्यातून सीरमच्या कोरोना लसी देशभरात पोहोचवल्या गेल्या. देशातील विविध शहरांत कोरोना लसींचे बॉक्स विमानानं पोहोचवण्यात आले. कोरोना लस विशिष्ट तापमानात ठेवावी लागते. त्यामुळे तिची वाहतूक आणि साठवणूक करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनावरील लस संपूर्ण देशासाठी संजीवनी ठरणार आहे. त्यामुळेच सीरमनं तयार केलेली कोरोना लस देशभरात पाठवली जात असताना कंपनीचे सीईओ अदार पुनावाला अतिशय भावुक झाले.सीरमनं तयार केलेल्या कोरोना लसीला देशात सर्वप्रथम मान्यता मिळाली. आता पुढील काही दिवसांत सीरमची लस तयार केलेली कोविशील्ड आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली जाईल. सीरमच्या कोविशील्ड लसींच्या खोक्यांवरील टॅगलाईन अतिशय लक्षवेधी ठरली आहे. कोविशील्ड लसींच्या खोक्यांवर सर्वे सन्तु निरामया: असा संदेश आहे. सीरमनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या सहकार्यानं कोरोनावरील लस तयार केली आहे. त्यामुळे ती लवकरच परदेशांमध्येही पाठवली जाईल. त्यामुळेच सर्वे सन्तु निरामया: हा संदेश खोक्यांवर इंग्रजीतही (May All Be Free From Disease) लिहिण्यात आला आहे.