नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. अशा संकट काळात लोक आपापल्या घरातच सुरक्षित राहू शकतात असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. यादरम्यान एका ९३ वर्षीय वृद्ध आणि ५ वर्षाच्या चिमुरडीमध्ये झालेला पत्रप्रपंच सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एलएमएस नावाच्या ट्विटर युजरने हा फोटो शेअर केला आहे.
या युजरने ट्विटरवर लिहिलंय की, माझ्या आजोबांचे वय ९३ वर्ष आहे. सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत आणि पूर्णपणे ठीक आहेत. अलीकडेच आमच्या शेजारील एका ५ वर्षाच्या चिमुरडीचं पत्र मिळालं. हे पत्र वाचल्यानंतर त्यांनीही त्याला उत्तर देत दुसरं पत्र लिहिलं. तुम्हीदेखील हे पत्र वाचलं तर तुमच्याही चेहऱ्यावर आनंद येईल असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे पत्र ५ वर्षाच्या किराहने पाठवलं आहे. फक्त तुम्ही ठीक आहात ना? यासाठी तिने हे पत्र पाठवलं. तसेच त्यावर उत्तर देण्यास सांगितले. किराहने तिच्या पत्रात लिहिलं आहे की, हॅलो, माझं नाव किराह आहे. मी ५ वर्षाची आहे. मला कोरोना व्हायरसमुळे घरात राहावं लागत आहे. मी फक्त हे जाणू इच्छिते की, तुम्ही ठीक आहात ना? मी इंद्रधनुष्य बनवलं आहे कारण मी तुम्हाला सांगते की तुम्ही एकटे नाही. प्लीज माझ्या पत्राला तुम्हाला उत्तर देता आलं तर द्या, नंबर ९ मध्ये राहणारी तुमची शेजारी असं या पत्रात लिहिलं आहे.
या पत्राला उत्तर देताना ९३ वर्षीय वृद्धाने लिहिलं की, हॅलो, किराह माझ्या तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल तुझे धन्यवाद. मी तुला सांगतो की, मी पूर्णपणे ठीक आहे. तुझ्यासारखं मलाही आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. तु माझी काळजी घेते हे समजल्यावर मला खूप बरं वाटलं. माझं नाव रॉन आहे आणि मी ९३ वर्षाचा आहे. कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिकट आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्या सर्वाना एकत्र मिळून प्रयत्न करावे लागतील असं त्यांनी लिहिलं यापुढे ते म्हणतात की, मला तुझं चित्र खूप आवडलं. मी माझ्या घरातील खिडकीवर हे लावणार कारण इतरांनाही ते पाहता येईल. मी पुन्हा एकदा तुझे धन्यवाद मानतो. तू लवकर आयसोलेशनमधून बाहेर पडशील, नंबर २४ मध्ये राहणारा रॉन.. हे पत्र आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे तर २८ हजारांहून जास्त लोकांनी यावर कमेंट केली आहे.