नवी दिल्ली – कोरोना व्हायरसची दहशत संपूर्ण जगात पसरली आहे. या महामारीने साडेतीन लाखांहून अधिक लोकांना विळख्यात ओढलं आहे. आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना सारख्या संकटाचा जग सामना करत असताना यातच सोशल मीडियावर अफवांना ऊत आलेला आहे. उत्तर भारतात अशीच एक अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
झोपलेल्या लोकांना कॉल येतो आणि जागे व्हा अन्यथा कोरोना व्हायरसमुळे तुम्ही दगड बनाल अशी अफवा पसरली आहे. अशा कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनकडून वारंवार केलं जात आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी घरीच राहा, स्वच्छता ठेवा, हात साबणाने साफ करा. बाकी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
अशा कठीण परिस्थितीत काही लोकांनी सोशल मीडियावर कोणतीही खातरजमा न करता लोकांकडून मॅसेज व्हायरल केले जात आहे. शनिवारी केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने एक परिपत्रक काढलं आहे. यात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला जागतिक महामारी घोषित करत आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे अशा स्थितीत सामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल, चुकीची माहिती दिली जाईल किंवा फेक न्यूज पोस्ट केली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात ४०० हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशातून येणारी विमान वाहतूक थांबवण्यात आली आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, श्रीलंकासह अनेक देशांनी लॉकडाऊन केला आहे. ३५ देशांमध्ये ९० कोटींहून अधिक लोक घरातच बंद आहेत. चीननंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीत ४ हजार ८०० लोकांनी जीव गमावला आहे.
अफवांवर मिळवा केंद्र सरकारकडून अचूक माहिती
सोशल मीडियावर अफवा पसरविण्यासाठी व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे याच प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने चॅटबोट अक्टिव्ह केले आहे. याद्वारे तुम्ही प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकता. या WhatsApp Chatbot चे नाव MyGov Corona Helpdesk असे ठेवण्यात आले असून तो सर्व युजरना उपलब्ध असणार आहे. यासाठी केवळ तुम्हाला हा नंबर कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करावा लागणार आहे. हा नंबर सेव्ह झाला की त्यावर तुम्हाला नमस्ते असा मेसेज पाठविला जाणार आहे. सर्वात आधी तुम्हाला 9013151515 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्हा करावा लागणार आहे.