नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरातील डॉक्टर आणि नर्स अहोरात्र झटत आहेत. तसेच, या कोरोनामुळे अनेकदा डॉक्टरांना आपल्या घरी सुद्धा जाता येत नाही. यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यातच भोपाळचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर देहारिया यांचा फोटो व्हायरल होत आहे. डॉ. सुधीर देहारिया पाच दिवसांच्या ड्युटीनंतर आपल्या घरी परतले आणि आपल्या कुटुंबीयांसोबत चहाचा आस्वाद घेतला.
या फोटोनुसार, डॉ. सुधीर देहारिया हे आपल्या कुटुंबीयांपासून लांब बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते पाच दिवसांच्या ड्युटीनंतर घरी परतले आहेत. घरी आल्यानंतर त्यांनी सोशल डिस्टेंसचे पालन केले. दरम्यान, सोशल मीडियावर हा फोटो जास्त लोकप्रिय झाला आहे.
तुम्ही सुद्धा आपल्या परिसरात अशाप्रकारे कोरोनावर मात करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करा आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक करा.
दरम्यान, कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 42 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच संपूर्ण जगात कोरोनाबधितांचा संख्या साडेआठ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. भारतात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. देशात कोरोनाचे १६११ रुग्ण असून, ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.