नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे देशात लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. लसीकरण केंद्रावरही कोरोनाचा धोका टाळता येऊ शकत नाही. याच दरम्यान मुंबईतील एका डॉक्टरांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
"तुम्ही फक्त लस घ्या, व्हायरस नको" असं सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कोरोना लसीकरणासाठी जाण्याआधी हा Video नक्की पाहा कारण डॉक्टरांनी यामध्ये मोलाचा सल्ला दिला आहे. मुंबईतील एका डॉक्टरांनी कोरोना व्हायरसबाबत जनजागृती केली आहे. तुषार शहा असं या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी आपला एक व्हिडीओ शेअर करून लोकांना अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. Zucker Doctor या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर तुषार यांनी आपल्या हातात काही पोस्टर्स घेतले आहेत.
पोस्टर्समधून त्यांनी कोरोना काळात महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पहिल्या पोस्टरवर "लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आपल्याला लस देतात". दुसऱ्या पोस्टरवर "लसीकरण केंद्रावरची गर्दी आपल्याला कोरोना व्हायरस देते" असं म्हटलं आहे. त्यानंतरच्या पोस्टर्सवर "तुम्ही फक्त लस घ्या पण त्या व्हायरसने बाधित होऊ नका, तुम्ही हे कसं कराल?" असं म्हटलं आहे. डॉक्टरांनी आपल्या काही पोस्टर्सवर लसीकरण केंद्रावर कोरोनापासून आपला बचाव कसा करावा, याबाबत सल्ला दिला आहे. यात काय करावं, काय करू नये हे सांगण्यात आले आहे.
"तोंडावर दोन मास्क लावा. आतमध्ये N95 आणि बाहेर सर्जिकल मास्क. हातमोजे वापरा. तसंच तोंडाला हात लावणं, हस्तांदोलन करणं टाळा. हातमोजे घातलेल्या हातांनाही सॅनिटायझर लावा आणि कोणाशीही अजिबात बोलू नका" अशा सूचना पोस्टर्समधून देण्यात आल्या आहेत. तसेच "लसीकरणाला जाण्यापूर्वी शरीरात पाणी असू द्या त्यामुळे तिथं जाण्याआधी चहा किंवा कॉफी घेऊन जा. तसेच लसीकरणाच्या रांगेत उभं राहून अन्नपदार्थ खाणं, पाणी पिणं हे सगळं टाळा तुम्ही जर लसीकरण केल्याचा फोटो काढत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरचा मास्क काढू नका" असं सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती सांगताना मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरही भावूक झाल्या आहेत. मुंबईतील इन्फीशियस डिसीज फिजीशियन डॉ तृप्ती गिलाडा (Dr. Trupti Gilada) यांनी कोरोनाची भयंकर परिस्थिती सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आहे. कोरोनाचं संकट, रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती आहे. लोकांनी काय करायला हवं यावर डॉ. तृप्ती गिलाडा यांनी व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. अशी परिस्थिती मी याआधी कधीच पाहिली नाही. आम्ही खूप हतबल आहोत. इतर डॉक्टरांप्रमाणे मीसुद्धा घाबरले आहे. काय करावं ते समजत नाही असं म्हटलं आहे.
"मुंबईची हालत खूप खराब आहे. मला इतकं हतबल, लाचार झाल्यासारखं कधीच वाटलं नाही. आम्हाला अनेक रुग्णांना घरीच उपचार द्यावे लागत आहेत. मी तुम्हाला विनंती करते, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला वाटतं की तुम्हाला वर्षभर कोरोना झाला नाही. म्हणजे तुम्ही सुपरहिरो आहात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे पण असं काही नाही. आम्ही अनेक तरुणांना पाहतो आहोत. अगदी 35 वयातील लोकही व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होणार नाही असं काही नाही. त्यामुळे काळजी घ्या" असं डॉ. तृप्ती यांनी म्हटलं आहे.