कराची - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरातील १९० हून अधिक देशांवर थैमान घातलं आहे. आतापर्यंत जगातील ८० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ४ लाखांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोना संसर्ग प्रत्येक देशासाठी मोठी डोकेदुखी बनला आहे.
जगावर कोरोनाचं संकट असताना पाकिस्तानातही कोरोनाचा फटका बसला आहे. मात्र तेथील पाकिस्तान सरकारमधील पर्यावरण मंत्री जरताज गुल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, त्याला कारणही तसेच आहे. मंत्री जरताज गुल वजीर या नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत येत असतात. यावेळी जरताज गुल यांनी कोविड १९ बाबत असं वक्तव्य केले आहे ज्यामुळे सोशल मीडियात त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
अलीकडेच मंत्री जरताज गुल वजीर यांनी पाकिस्तानच्या एका मीडिया चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान कोविड १९ बाबत पत्रकाराने प्रश्न विचारला, त्यावेळी जरताज गुल यांनी दिलेल्या उत्तराने सर्वच हैराण झाले. जरताज गुल म्हणाल्या की, कोविड १९ चा अर्थ असा आहे की यात १९ पॉईंट्स असतात, जे कोणत्याही देशाला कशाही प्रकारे लागू होऊ शकतात. पंतप्रधान इमरान खान यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने अशाप्रकारे विधान केल्यानं पाकिस्तान सरकारची नेटिझन्स खिल्ली उडवत आहेत.
पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला, त्यात कोविड १९ मध्ये १९ याचा अर्थ काय आहे, याचा जमीन हादरवणारा शोध अशा शब्दात ट्विट करुन टोमणा मारला आहे. त्यावर अनेकांनी हे ट्विट लाईक्स आणि शेअर केले आहे. वास्तविक, कोविड -१९ म्हणजे 'कोरोनाव्हायरस रोग २०१९' कोविड -१९ मधील 'CO' या शब्दाचा अर्थ कोरोना, 'VI' विषाणूसाठी आणि रोगासाठी 'D' आहे. यापूर्वी हा आजार २०१९ नोवल कोरोनाव्हायरस किंवा २०१९-एनसीओव्ही म्हणून ओळखला जात असे.
काही आठवड्यांपूर्वी एका पाकिस्तानी मौलानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते म्हणत होते की, कोरोना साथीचा त्रास टाळण्यासाठी लोकांना जास्तीत जास्त झोपावे. डॉक्टर नेहमीच आपल्याला अधिक झोपेचा सल्ला देतात. आपण जितके जास्त झोपतो तितके व्हायरस झोपी जाईल. तो आपले नुकसान करणार नाही. जेव्हा आपण झोपतो तेव्हा व्हायरसही झोपतो, जेव्हा आपण मरतो तेव्हा मरतो, हे विधानही सोशल मीडियात चांगलेच गाजले होते.