नवी दिल्ली – देशात कोरोना वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या वर पोहचला असून ३२० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या परिस्थितीत एका न्यूज मॅगजीनने दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे निर्णय घेताना आयसीएमआरने बनवलेल्या कोविड १९ टास्क फोर्सशी सल्ला मसलत करत नाहीत.
विद्या कृष्णन यांनी हा रिपोर्ट केला आहे. यात एक्सपर्ट समुहाच्या ४ सदस्यांच्या विधानाच्या आधारावर हा दावा करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस महामारी संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देण्यासाठी २१ सदस्यांचा समावेश असलेली राष्ट्रीय कोविड १९ टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. यामध्ये देशातील सर्वोच्च वैज्ञानिकदेखील सहभागी आहेत. अलीकडेच लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घोषित करण्यापूर्वी या टीमसोबत आठवडण्यात एकदाही बैठक घेतली नाही असं सांगण्यात आलं आहे.
याबाबत काही तथ्य आढळलं?
आयसीएमआरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन असं म्हटलं आहे की, एका मीडिया रिपोर्टमध्ये कोविड १९ टास्क फोर्सबाबत दावा केला तो पूर्णत: खोटा आहे. मागील महिन्यात टास्क फोर्ससोबत १४ वेळा बैठक झाली आहे. सर्व निर्णयात टास्क फोर्सच्या सदस्यांचा सहभाग असतो. त्यामुळे कृपया अशाप्रकारे कोणत्याही बातमीत सत्य नसून अफवांपासून सावधान राहा असं सांगितले.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोनेही या ट्विटला कोट करुन मीडिया रिपोर्टचं खंडन केले आहे. एका न्यूज मॅगजीनमध्ये दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढवण्यापूर्वी २१ सदस्यांच्या टास्कफोर्सचा सल्ला घेतला नव्हता. मात्र पंतप्रधानांनी घेतलेले सर्व निर्णय टास्क फोर्सला विचारात घेऊनच घेतले असल्याचं त्यांनी सांगितले.
कोरोना संक्रमित साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपला त्यानंतर देशातील दुसरा लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा त्यांनी रविवारी केली. यामध्ये त्यांनी असंही सांगितले की, २० एप्रिलपर्यंत ज्या जिल्ह्यात अथवा राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळणार नाही किंवा कोरोना रोखण्यास जे यशस्वी होतील अशा विभागात लॉकडाऊनमध्ये शिथील करुन काही सूट देण्यात येईल असंही पंतप्रधानांनी सांगितले आहे.